रत्नागिरी - आरे येथील समुद्रात पोहायला गेलेल्या पर्यटकाला बुडताना जीवरक्षकाने वाचवले. बुधवारी दुपारी २ च्या सुमारास ही घटना घडली. सध्या दिवाळी सुट्टी सुरू असल्याने पर्यटकांचा फिरण्याकडे अधिक कल वाढला आहे. अशातच पावसाने विश्रांती घेतल्यामुळे पर्यटक कोकणाकडे येऊ लागले आहेत.
हेही वाचा - समुद्रातील शांतता चित्राच्या माध्यमातून रेखाटण्याचा प्रयत्न
बुधवारी कोल्हापूर येथील सहा पर्यटक गणपतीपुळे येथे जात होते. दुपारी २ च्या सुमारास आरे गावातील समुद्र पाहण्यास ते गेले. दरम्यान ते सहाजण पोहायला समुद्रात उतरले. मात्र, समुद्रातील पाण्याचा अंदाज न आल्याने, प्रशांत मेहाते (वय २४) हा युवक पाण्याबरोबर खेचला गेला आणि गटांगळ्या खाऊ लागला. दरम्यान, ही बाब तेथील तैनात असलेल्या जीवरक्षक हितेश मयेकर याच्या लक्षात आली. त्याने तात्काळ संतोष सुर्वे, पोलीस पाटील आदेश कदम, स्वप्नील भोळे, मया वारेकर, आनंद पेडणेकर आणि अमोल घाग यांच्या मदतीने त्याला पाण्याच्या बाहेर काढले आणि त्याचा जीव वाचवला.