कराड (सातारा) - कराड तालुक्यातील तांबवे गावातील मळा नावाच्या शिवारात आज सकाळी सातच्या सुमारास एका जनावरांच्या शेडमध्ये बिबट्या शिरला. बिबट्याला शेडच्या दारात पाहून शेतकर्याची पाचावर धारण बसली. त्याने आरडाओरडा करताच बिबट्या शेडमागील उसाच्या शेतात धूम ठोकली. मात्र, काहीवेळ तो तेथेच उभा होता. यावेळी शेतकर्याने बिबट्याचे मोबाईलमध्ये चित्रिकरण केले. या घटनेची माहिती मिळताच वन कर्मचारी तातडीने घटनास्थळी आले. पण, वन कर्मचार्यांनी काहीच न केल्याने शेतकरी संतापले आहेत.
तांबवे गावातील आप्पासो पाटील हा तरूण शेतकरी सकाळी मळा नावाच्या शिवारातील शेडमध्ये असताना बिबट्या तेथे आला. त्याने शेडच्या दरवाजातून आत डोकावल्याचे पाहून आप्पासाो पाटील याची पाचावर धारण बसली. त्याने आरडाओरडा करताच बिबट्या शेडमागील उसाच्या शेतात गेला. बिबट्या शेतात उभा असल्याचे पाहून त्याने शेडच्या मोकळ्या जागेतून बिबट्याचे मोबाईलमध्ये चित्रिकरण केले. काही वेळाने बिबट्या तेथून निघून गेला.
बिबट्याकडून दोन शेळ्यांची शिकार, शेतकर्यावर हल्ला
तांबवे परिसरात एका मादी बिबट्यासह तीन बछड्यांचा वावर आहे. मागील आठवड्यात तीन ठिकाणी शेतकर्यांना बिबट्यांचे दर्शन झाले आहे. एका बिबट्याने सलग दोन दिवसात दगडू शेळके या शेतकर्याच्या दोन शेळ्या ठार केल्या आहेत. तसेच शेतकऱ्यावर हल्ल्याचाही प्रयत्न केला. मात्र, शेतकरी सुदैवाने बिबट्याच्या हल्ल्यातून बचावला.
नागरी वस्तीतही बिबट्याचे दर्शन
तांबवे बाजारपेठेपासून शंभर मीटर अंतरावरील करपे वस्तीवर शनिवारी (दि. 4) सायंकाळी सातच्या सुमारास बिबट्याचे दर्शन झाले होते. त्यामुळे ग्रामस्थही करपे वस्तीकडे धावले. नागरीकांचा सुगावा लागताच बिबट्याने उसाच्या शेतात धूम ठोकली होती. मात्र, त्याच रात्री बौध्द वस्तीवरील एका कुत्र्याची बिबट्याने शिकार केल्याचे रविवारी (दि. 5) सकाळी आढळून आले.
वन कर्मचार्यांच्या उत्तराने शेतकर्यांमध्ये संताप
वनविभागाने बिबट्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, शिवारात पिंजरा लावावा, अशी मागणी तांबवे ग्रामस्थांनी वनविभागाकडे केली. परंतु, एखाद्या नागरीकावर हल्ला केल्याशिवाय आम्ही काहीच करू शकत नाही, असे वनविभागाच्या कर्मचार्यांकडून सांगण्यात आले. त्यामुळे तांबवे ग्रामस्थ संतापले आहेत. बिबट्याने एखाद्याचा बळी घेतल्यानंतरच वनविभाग बिबट्याला जेरबंद करणार आहे का, असा सवाल तांबवे ग्रामस्थांनी केला आहे.