सातारा - कृषिराज्यमंत्री विश्वजीत कदम यांच्या सोनहिरा सहकारी साखर कारखान्यावरील ऊसतोड कामगार आपल्या मायदेशी म्हणजे बीडला निघाले असताना, त्यांना सातारा जिल्ह्यातील म्हसवड येथे पोलिसांनी अडवले आहे. आज (शुक्रवारी) सांगली जिल्ह्यातून 38 ट्रॅक्टरमध्ये 350 ते 400 ऊसतोड कामगार उपाशीपोटी आपल्या गावी निघाले होते.
दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादळ आणि पावसामुळे ऊसतोड कामगारांचा निवारा उडून गेला. तसेच त्या ठिकाणी 3 हजार रुपये भाडे घेत असल्याचे ऊसतोड मजूर महिला सांगत होत्या. आम्ही उपाशी मरत असून, फक्त 20 किलो गहू 8 जणांना दिले आहेत. एवढ्यावर आम्ही जगायचं कस? असा प्रश्न महिलांनी केला आहे. आमच्या गावाला जाऊ द्या! अशा विनवण्या त्या महिला करत आहेत.
पोलिसांनी मजुरांना पुन्हा सांगली जिल्ह्यात पाठवले आहे. जिल्ह्यातील सीमा लॉक करण्यात आल्या आहेत. तरिही एवढ्या मोठया प्रमाणात हे ऊसतोड मजूर दोन तालुके आणि एका जिल्ह्याची सीमा क्रॉस करून आले कसे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. सोनहिरा सहकारी साखर कारखाना हा कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांचा आहे. तसेच त्यांचे चुलते आणि काँग्रेसचे आमदार मोहनराव कदम हे या कारखान्याचे अध्यक्ष आहेत.