कराड (सातारा) - दिवंगत पतंगराव कदम यांचा मयत शेअर्स ट्रान्स्फर करण्यासाठी मी कृष्णा कारखान्याकडे अर्ज केला आहे. परंतु, अद्याप मयत वारस नोंद करून शेअर्स माझ्या नावे केला नसल्याचा आरोप सहकार राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी केला आहे. वारस या नात्याने मी शेअर्स घेणारच, परंतु सर्व मयत सभासदांच्या वारसांनाही शेअर्स मिळवून देणार असल्याचेही आश्वासन त्यांनी कृष्णा कारखान्याच्या सभासदांना दिले. कृष्णा कारखाना निवडणुकीतील रयत पॅनेलच्या प्रचार शुभारंभाच्या सभेत विश्वजीत कदम बोलत होते.
'उच्चांकी ऊस दरासाठी सभासदांनी रयत पॅनेलला विजयी करा'
सातारा पोटनिवडणुकीतील पावसात झालेल्या सभेचा दाखला देत विश्वजीत कदम म्हणाले, की 'पावसात होणार्या सभा विजय मिळवून देतात. सातार्याप्रमाणेच कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीत तोच इतिहास घडलेला लवकरच पाहायला मिळेल. रयत पॅनेलच्या प्रचार शुभारंभाच्या सभेला पावसाने हजेरी लावणे हा शुभसंकेत मानायला पाहिजे. कृष्णा कारखान्याच्या सत्ताधार्यांचा अकार्यक्षम कारभार लक्षात घेऊन सभासदांनी उच्चांकी ऊस दरासाठी रयत पॅनेलला विजयी करा', असे आवाहन त्यांनी केले.
'गेटकेनचा ऊस आणणे बंद करू'
'दिशा, विचार व लोकांच्या पाठबळामुळे कृष्णा कारखान्याच्या माध्यमातून कृष्णाकाठी वैभव उभे राहिले आहे. कारखान्याची ही निवडणूक राजकारणासाठी नाही, तर सभासदांच्या जीवनात परिवर्तन करण्यासाठी महत्वपूर्ण ठरणार आहे. आम्ही सत्तेवर आल्यानंतर खुले सभासदत्व आणि सभासदांचा मालक बनण्याचा अधिकार कायम राखणार आहोत. मयत शेअर्स वारस नोंदी तातडीने केल्या जातील. नवसरंमजामशाही मोडून सभासदांना मालकाचा दर्जा देऊ. सवलतीची साखर व सभासद सुविधा गट कार्यालयाच्या माध्यमातून सभासदांच्या दारात पोहचवल्या जातील. बैठी पाणीपट्टी बंद करून उच्चांकी दर देऊ. गेटकेनचा ऊस आणणे बंद करू', असा रयत पॅनेलचा जाहीरनामा असल्याचे डॉ. इंद्रजीत मोहिते यांनी म्हटले.
दरम्यान, रयत पॅनेलप्रमुख डॉ. इंद्रजीत मोहिते, कराड दक्षिण काँग्रेसचे अध्यक्ष मनोहर शिंदे, सोनहिरा सहकारी साखर कारखान्याचे संचालक रघुनाथराव कदम, युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष शिवराज मोरे, राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे संचालक दादासाहेब मोरे, सातारा जिल्हा परिषदेचे सदस्य शंकरराव खबाले, पै. नाना पाटील, अॅड. नरेंद्र पाटील, राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे संचालक दादासाहेब मोरे, जयसिंगराव कदम यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
हेही वाचा - परीचारिकांच्या आंदोलनाला सुरुवात; मुंबईसह 25 जिल्ह्यात दोन तास निदर्शने