सातारा : साताऱ्यातील पोवई नाक्यावर काही तरुणांनी हातात कोयते घेऊन दहशत माजवली आहे. पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे. पुण्यातील कोयता गॅंगच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या नंतरही कोयते नाचवून दहशत माजविणाऱ्यांना जरब बसलेला नाही, हे साताऱ्यातील घटनेवरून स्पष्ट होत आहे.
पोवई नाक्यावर दहशत : पोवई नाक्यावरील सयाजीराव हायस्कूलसमोर काही तरूण हातात कोयते घेऊन दहशत करत असल्याची माहिती मिळताच सातारा शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दोघांना तात्काळ ताब्यात घेतले तर पळून जाणाऱ्या तिघांना शिताफीने पकडले. दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पाच जणांना पोलीस ठाण्यात नेण्यात आले. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.
साताऱ्यातही कोयता गॅंग सक्रिय : पुण्यातील उपनगरामध्ये कोयता गँगमधील गुंडांनी धुमाकूळ घालून हातगाड्या, दुकानांचे नुकसान करत दहशत माजवली होती. पुणे पोलीस दलातील दोन कर्मचाऱ्यांनी दहशत माजवणाऱ्या गुंडांना पोलिसी खाक्या दाखवून त्यांच्या मुसक्या आवळल्या होत्या. त्यानंतर पेन्शनर सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या साताऱ्यातही कोयता गँग सक्रीय झाली की काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
कायदा-सुव्यस्थेचा प्रश्न गंभीर : केवळ सातारा शहरच नाही तर संपूर्ण जिल्ह्यात कायदा-सुव्यस्थेचा प्रश्न गंभीर झाला आहे. कोयते नाचवून दहशत निर्माण करणाऱ्यांवर पोलीस कारवाई करत आहेत. तसेच पुण्यातील थेरं साताऱ्यात चालणार नाहीत, असा इशारा पोलिसांनी दिला असला तरी पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी पदभार घेतल्यानंतर जो दरारा होता तो आता कमी झाल्याचे या घटनेमुळे दिसत आहे.
कोयता गॅंगची गुंडगिरी : पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील नऱ्हे बुद्रुक येथील माळवाडी परिसरात फक्त 'गाडी हळू चालवा', असे सांगितल्याने काही सराईतांनी हातात कोयते आणि तलवार घेऊन दहशत माजवविण्याचा प्रयत्न केला. गुंडांनी संबंधित महिलेला शिवीगाळ करत मारहाण केली. हा धक्कादायक प्रकार व्हिडीओमध्ये चित्रित झाला आहे. रविवारी सायंकाळी पाच ते सहा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला आहे.
महिलांना शिविगाळ : नऱ्हे बुद्रुक येथील माळवाडी गावात रविवारी सायंकाळी स्थानिक महिला आपल्या घरासमोर बसली होती आणि त्यांची लहान मुले बाहेर खेळत होती. त्याचवेळेस दुचाकीवरून काही तरुण वेगाने गाडी पळवत ये-जा करत होते. महिलेने मुले खेळत असल्याने दुचाकीस्वारांना हळू गाडी चालवण्याची विनंती केली. त्याचा राग मनात धरुन त्या तरुणांनी महिलेला शिवीगाळ करत मारहाण केली. त्यानंतर पुन्हा काही वेळात हातात तलवार व कोयते घेऊन ते तरुण इतरांना सोबत घेऊन आले. अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करू लागले. या घटनेनंतर परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हवेली पोलिसांनी याची दखल घेतली. पोलिसांची दोन पथके घटनास्थळी दाखल झाली. आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असून पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे.
घटनेचा व्हिडिओ व्हायरल : या घटनेचा व्हिडिओ परिसरात व्हायरल झाला आहे. गावातील एका दुकानदाराकडून फुकट सिगारेट घेण्यासाठी या सराईतांनी त्याला धमकावल्याचीही महिती मिळाली आहे. गांजाची नशा करुन हे सराईत सातत्याने गावात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतात. पोलिसांनी यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.