सातारा - केरळ राज्यातील कोट्यवधी रुपयांच्या साडेसात किलो सोन्यावरील दरोडा टाकण्यात आला होता. या प्रकरणात केरळ पोलिसांनी साताऱ्यातील सराफा व्यापारी राहूल घाडगेला अटक केली होती. आता सोने चोरी प्रकरणात केरळ पोलिसांनी घाडगेच्या दुकानातून साडेतीन किलो चांदी हस्तगत केली आहे. या कारवाईने शहरात खळबळ माजली आहे.
राहूल घाडगे घेतले होते लुटीचे सोने-
केरळच्या 'मारूथा रोड सहकारी ग्रामीण क्रेडिट सोसायटी'तील साडेसात किलो सोने अन् अठरा हजारांची रोकड लुटणारा संशयित परेश अशोक अंबूर्ले उर्फ निखिल अशोक जोशी केरळ पोलिसांच्या अटकेत आहे. त्याने जुलैमध्ये केरळमध्ये दरोडा टाकत ही लुट केली होती. या लुटीतील सोने जोशीने साताऱ्यात येऊन काही लोकांना विकले होते. त्यामध्ये राहूल घाडगे या सराफाचा सहभाग स्पष्ट झाल्यानंतर केरळ पोलिसांनी त्याला काही दिवसांपूर्वी अटक केली होती.
सदाशिव पेठेतील दुकानातून चांदी हस्तगत-
केरळ पोलिसांचे एक पथक राहूल घाडगेला घेऊन अधिक तपास करण्यासाठी साताऱ्यात आले आहे. त्यांनी सदाशिव पेठेतील घाडगेच्या शनिवारी धडक देऊन तपासणी केली. त्यावेळी त्यांनी या पेढीतून सुमारे साडेतीन किलो चांदी हस्तगत केली. घाडगे याने जोशीने टाकलेल्या दरोड्यातील सोने विक्रीतून मिळालेल्या मोबदल्यातून ही चांदी खरेदी केल्याचे केरळ पोलिसांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.
डाॅ. साबळे अद्याप फरारच-
या गुन्ह्यात साताऱ्यातील संशयित डाॅ. साबळे याचाही सहभाग स्पष्ट झाला आहे. मात्र सध्या तो फरार असल्याचे या पोलीस पथकातील अधिकाऱ्याने माध्यमांशी बोलताना सांगितले. केरळ राज्यातील पलक्कड येथील 'मारूथा रोड क्रेडिट सोसायटी'तील साडेसात किलो सोने लूटीचा प्रकार घडला. या प्रकरणी अटक केलेला संशयित परेश अशोक अंबूर्ले उर्फ निखील अशोक जोशी याला केरळ पोलिसांनी साताऱ्यातील एका हाॅटेलमधून ताब्यात घेतले होते. त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे जोशीच्या सोने खरेदीदारांच्या मागावर सध्या केरळ पोलीस आहेत.
हेही वाचा - केरळच्या कोट्यवधी रुपयांच्या दरोड्याचे साताऱ्यात धागेदोरे, मुख्य संशयित अटकेत
हेही वाचा - सराफा दुकान दरोडा प्रकरणी दोन आरोपींना मध्य प्रदेशातून फिल्मी स्टाईलने अटक; अमितेश कुमारांनी सांगितला थरार