सातारा - केरळ राज्यात खळबळ माजविणाऱ्या कोट्यवधी रुपयांच्या, साडेसात किलो सोन्यावरील दरोडा प्रकरणाचे धागेदोरे साताऱ्यापर्यंत पोहोचले आहेत. केरळ पोलिसांनी दरोड्यातील काही सोने हस्तगत केले आहे. या प्रकरणी साताऱ्यातील एका डॉक्टरासह काही व्यापारी व काही युवा कार्यकर्ते पोलिसांच्या रडारवर आहेत.
सातारा पोलिसांचा दुजोरा
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी केरळ पोलिसांच्या तपासाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. या प्रकरणी साताऱ्यातील काही लोकांना ताब्यात घेतल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. केरळ राज्यातील पलक्कड येथील मारूथा रोड क्रेडीट सोसायटीतील साडेसात किलो सोने लुटीचा प्रकार घडला. या प्रकरणी संशयित परेश अशोक अंबुर्ले उर्फ निखील अशोक जोशी याला केरळ पोलिसांनी साताऱ्यातील एका हॉटेलमधून ताब्यात घेतले आहे. त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे जोशीकडून सोने खरेदी करणाऱ्यांवर पोलीस मागावर आहेत. या खरेदीदारांमध्ये एका नामांकीत डॉक्टरचेही नाव पुढे आले आहे. त्यानंतर खरेदीदारांची साखळीच पुढे आली आहे.
केरळमधील सर्वात मोठा दरोडा
काही घरांवर केरळ पोलिसांची पाळत ठेवली असल्याचे समजते. सोने खरेदी प्रकरणात हा डॉक्टर काही व्यापारी व काही युवा कार्यकर्ते पोलिसांच्या रडारवर आहेत. दोन पोलीस अधिकारी व 24 जणांचा समावेश असलेली दोन तपास पथके साताऱ्यातील एका लॉजवर तळ ठोकून आहेत. तेथूनच केरळ पोलिसांची तपास सूत्रे फिरत आहेत. केरळच्या 'मारूथा'वर पडलेला दरोडा म्हणजे केरळ राज्यातील सर्वात मोठा दरोडा असल्याचे मानले जात आहे.
साताऱ्यात पोलिसांची धरपकड
मारुथा रोड सहकारी ग्रामीण क्रेडीट सोसायटीतील साडेसात किलो सोने, 18 हजारांच्या लुटीप्रकरणी संशयित परेश अशोक अंबुर्ले उर्फ निखील जोशी यानेच केल्याचे आजपर्यंतच्या तपासात स्पष्ट झाले आहे. त्याने लुटलेले सोने हस्तगत करण्यासाठी पोलिसांची धरपकड सुरू आहे. सर्व सोने साताऱ्यात असल्याचे सांगण्यात येते. त्यातील काही हस्तगतही झाले आहे. नेमके किती सोने हस्तगत झाले आणि चोरीच्या सोने खरेदीमध्ये किती व कोणते बडे मासे पोलिसांच्या गळाला लागले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. लवकरच केरळ पोलीस माध्यमांसमोर या गुन्ह्याचा पर्दाफाश करतील, असे सांगण्यात येत आहे.
हेही वाचा - साताऱ्यातील कुख्यात गुंड पिल्या नलवडेवर 'एमपीडीए'अंतर्गत कारवाई