सातारा - कराड जनता सहकारी बँक दिवाळखोरीत निघाली असल्यामुळे संतप्त ठेवीदारांनी थेट अध्यक्षांना घेराव घालून बँकेमध्ये गोंधळ घातला आहे. ठेवीदारांचे कोट्यवधी रुपये बँकेत अडकले आहेत. ठेवीदारांनी शनिवारी बँकेच्या मुख्य कार्यालयात जाऊन अध्यक्ष राजेश पाटील-वाठारकर यांना विचारणा केली.
हेही वाचा - बेळगाव : महाराष्ट्रात कन्नड संस्कृती जपण्याचा प्रयत्न - राऊत
दिवाळखोरीत निघालेल्या कराड जनता सहकारी बँकेत गेल्या अडीच वर्षापासून ठेवीदारांचे पैसे अडकले आहेत. आम्ही आयुष्यभर कमावलेली रक्कम बँकेत ठेवली असून, बँक दिवाळखोरीत निघाल्याने आता आमच्यापुढे मोठा प्रश्न उभा राहिला आहे. बँकेने फसवणूक केल्याची भावना ठेवीदारांमध्ये पाहायला मिळत आहे. बँक अडचणीत येण्यास बँकेचे अध्यक्ष आणि संचालक मंडळ जबाबदार असल्याचा आरोप यावेळी ठेवीदारांनी केला आहे. ठेवी परत मिळत नसल्याने संतापलेल्या ठेवीदारांनी शनिवारी बँकेच्या मुख्य कार्यालयावर धडक दिली. बँकेत घुसून ठिय्या मांडला. तसेच बँकेच्या अध्यक्षांना घेराव घालत आमच्या ठेवी परत करण्याची मागणी केली.
ठेवीदारांच्या संतापामुळे अध्यक्षांची मात्र यावेळी घाबरगुंडी झाली होती. यासंबंधी कराड दौर्यावर असलेल्या सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांना ठेवीदारांनी निवेदन दिले आहे. कराड जनता बँकेच्या ठेवीदारांना दिलासा देण्याचा आपण प्रयत्न करू, अशी ग्वाही सहकारमंत्री पाटील यांनी ठेवीदारांना यावेळी दिली.
हेही वाचा - राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांना मुख्यमंत्र्यांनी बांधले शिवबंधन