सातारा - सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यात मांढरदेवी डोंगरावर ही यात्रा पार पडत आहे. शाकंभरी पौर्णिमेला भरणाऱ्या या यात्रेचा हा आजचा महत्त्वाचा दिवस मानला जातो. काळूबाईच्या नावानं चांगभलं’च्या जयघोषात मांढरदेवी येथील काळूबाई यात्रेस उत्साहपूर्ण वातावरणात दोन दिवसापूर्वी सुरूवात झाली. शाकंभरी पोर्णिमेला शुक्रवारी देवस्थान ट्रस्टचे मुख्य प्रशासक तथा जिल्हा न्यायाधीश राजेंद्र दत्तात्रय सावंत यांच्या हस्ते काळेश्वरी देवीची विधिवत शासकीय महापूजा करण्यात आली.
यावेळी देवस्थान ट्रस्टचे चेअरमन तथा जिल्हा सत्र न्यायाधीश दिनेश आर. शेट्टी, विश्वस्त तथा प्रांताधिकारी श्रीमती संगीता चौगुले-राजापुरकर, प्रशासकीय विश्वस्त तथा तहसीलदार रणजीत भोसले व त्यांच्या पत्नी, पोलीस निरीक्षक देवीश्री मोहिते-भोसले, वाईचे न्यायाधीश व्ही. एन. गिरवलकर, न्या. डी. आर. माळी, विश्वस्त अॅड. मिलिंद ओक, अॅड. महेश कुलकर्णी, सीए. अतुल दोशी, जीवन मांढरे, चंद्रकांत मांढरे, राजगुरू कोचळे, सुधाकर क्षीरसागर, शैलेश क्षीरसागर, सचिव रामदास खामकर, सहसचिव लक्ष्मण चोपडे आदि उपस्थित होते.
2005 मध्ये घडलेल्या दुर्घटनेनंतर या गडावरील संपूर्ण यात्रा ही शासकीय यंत्रणेकडून पार पाडली जाते. गडावर चौका-चौकात पोलीस यंत्रणा तैनात करण्यात आली असून प्रत्येक वाहनाची तपासणी केली जात आहे. गडावर कोंबडे, बकरे आणि वाद्य नेण्यास परवानगी नसल्यामुळे असे साहित्य सापडल्यावर ते जप्त करण्याचे आदेश दिले गेलेत. यात्रेत मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.