सातारा - फ्लेमिंगो पक्षांचे आश्रयस्थान असलेल्या मायणी तलावाच्या परिसराला समुह पक्षी संवर्धनाचे आणि कोल्हे-रानकुत्री टोळ्यांच्या अस्तित्वामुळे आकर्षणाचे केंद्र असलेल्या जोर-जांभळीच्या खोऱयाला 'संवर्धन राखीव वनक्षेत्रा'चा (कॉन्झर्वेशन रिझर्व्ह) दर्जा मिळाला. मायणी तलावासह येराळवाडी, कानकात्रे व सुर्याचीवाडी तलाव या क्षेत्रालाही समुह पक्षी संवर्धन राखीव क्षेत्राचा दर्जा बहाल करण्यात आला आहे. याबाबतची माहिती कोल्हापूरचे मुख्य वनसंरक्षक डॉ. व्ही. क्लेमेट बेन यांनी दिली.
वन्यजीव मंडळाचा हिरवा कंदील -
सातारा जिल्ह्यातील मायणी, जोर-जांभळी या वनक्षेत्रांना 'संवर्धन राखीव'चा दर्जा देण्याचा प्रस्ताव राज्य शासनाच्या विचाराधीन होता. वन्यजीव मंडळाच्या बैठकीत त्याला मंजूरी मिळाली. शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या 'राज्य वन्यजीव मंडळा'च्या बैठकीत या प्रस्तावाला हिरवा कंदील दाखवण्यात आला.
रानकुत्र्यांच्या टोळ्यांना संरक्षण -
वाईपासून २५ किलो मीटर अंतरावर, सातारा-पुणे जिल्ह्याच्या हद्दीवर जोर व जांभळीचे खोरे आहे. त्याचे ६ हजार ५११ हेक्टर क्षेत्र संरक्षित झाले आहे. या भागात वन्य प्राणी भरपूर आहेत. विशेषत: रानकुत्र्यांची संख्या अधिक आहे. मात्र हे वन्यजीव आजपर्यंत दुर्लक्षित होते.
पक्षांचे आश्रयस्थान होणार संवर्धित -
खटाव तालुक्यातील मायणी तलावालगतचे वनविभागाचे क्षेत्र 'मायणी पक्षी अभयारण्य' या नावाने संबोधले जात होते. मात्र, कागदोपत्री त्याला कोणताही आधार नव्हता. त्यामुळे हे क्षेत्र संरक्षीत होण्याची गरज होती. त्यादृष्टीने साताऱ्यातील पर्यावरणाचे अभ्यासक सुनील भोईटे यांच्या सहकार्याने वनविभागाने प्रस्ताव तयार करून शासनाच्या मंजुरीला पाठवला होता. नव्या मायणी समुह पक्षी संवर्धन राखीव क्षेत्रामध्ये पक्षांचे आश्रयस्थान संवर्धित होणार आहे.
मानवी हस्तक्षेप रोखणार -
संवर्धन राखीवच्या दर्जामुळे वन्यजीव व पक्षी संवर्धनासाठी आवश्यक निधी केंद्र व राज्य शासनाकडून मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या क्षेत्राचे संरक्षण व पर्यटन विकासाच्या दृष्टीने स्थानिकांच्या सहभागातून संयुक्त वन व्यवस्थापन समिती नेमता येईल. तसेच मानवी हस्तक्षेप रोखण्यासाठी पावले उचलली जातील, असे उपवनसंरक्षक डॉ. भारतसिंह हाडा यांनी स्पष्ट केले.
'सह्याद्री'तील ७ वनक्षेत्रांना संरक्षण -
कोल्हापूर वन विभागाचा सह्याद्रीमधील एकूण सात वनक्षेत्रांचा 'संवर्धन राखीव वनक्षेत्रा'चा प्रस्ताव राज्य सरकारने मान्य केला आहे. सह्याद्रीमधील एकूण ८६ हजार ५५४ हेक्टर वनक्षेत्राला संरक्षणाचा दर्जा मिळाला आहे. याशिवाय साताऱ्यातील पक्षी अधिवासाकरिता महत्त्वाच्या असणाऱ्या 'मायणी' वनक्षेत्रालाही (८६६ हेक्टक) 'कॉन्झर्वेशन रिझर्व्ह'चा दर्जा देण्यास मान्यता मिळाली आहे.
वन्यजीव भ्रमणमार्ग जोडण्यास मदत -
कोल्हापूर वन विभागाने साताऱ्यातील जोर-जांभळी (६,५११ हेक्टर), कोल्हापूरमधील विशालगड (९,३२४ हे), पन्हाळा (७,२९१ हे), गगनबावडा (१०,५४८ हे), आजरा-भुदरगड (२४,६६३ हे), चंदगड (२२,५२३ हे) आणि सिंधुदुर्गमधील आंबोली-दोडामार्ग (५,६९२ हे) येथील वनक्षेत्रांना संवर्धन राखीवचा दर्जा मिळाला आहे. साताऱ्यातील जोर-जांभळीपासून सिंधुदुर्गातील 'तिलारी संवर्धन राखीव वनक्षेत्रा'पर्यंत 'सह्याद्री व्याघ प्रकल्पा'चा वन्यजीव भ्रमणमार्ग जोडला जाण्यास मदत होणार आहे, अशी प्रतिक्रिया साताऱयाचे माजी मानद वन्यजीव रक्षक सुनील भोईटे यांनी व्यक्त केली.
जाचक बंधने नाहीत, उलट लाभ -
नव्या वर्षात मायणी व जोर-जांभळी येथे पर्यटन वाढीबरोबरच स्थानिकांसाठी रोजगार निर्मितीला चालना मिळेल. विशेष म्हणजे या दर्जानंतर खासगी जागा संपादन अथवा कोणतीही जादा जाचक बंधने स्थानिकांवर पडणार नाहीत. मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी वनविभाग प्रयत्न करत असते. मात्र, निधी, साधन सामग्रीची कमतरता यामुळे अशा प्रकारच्या प्रयत्नांवर मर्यादा पडतात. या वन्यजीवांसाठी त्याच्या अधिवासात कुरण विकासाच्या माध्यमातून खाद्य निर्मिती, पाणवठे बांधले तर हे प्राणी मानवी वस्तीकडे वळणार नाहीत.