सातारा - विवाहानंतर नातेवाईकांसमवेत मोबाईलवर फोटो काढणे एका कुटुंबाला चांगलेच महागात पडले. मुलीने दीराच्या लग्नासाठी आलेल्या आपल्या आई-वडीलांकडे दागिने ठेवलेली पर्स दिली होती. तिचे वडील नातेवाईकांचे फोटो काढत असताना अज्ञात चोरट्याने ती पर्स लंपास केली. त्या पर्समध्ये 2 लाख 10 हजाराचे दागिने आणि 10 हजाराची रोख रक्कम, असा 2 लाख 20 हजार रूपयांचा ऐवज होता.
हेही वाचा - बेपत्ता तरुणीचा संशयास्परीत्या विहिरीत आढळला मृतदेह
याप्रकरणी सुखेंदू छोटालाल दोशी (वय 51, रा. कर्जत, जि. अहमदनगर) यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अज्ञात चोरट्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. कर्जत येथील सुखेंदू दोशी हे आपल्या विवाहित मुलीच्या दीराच्या लग्नासाठी कराडला आले होते. कराडमधील हॉटेल पंकज लॉन्स येथे सोमवारी (दि. 20) लग्न समारंभ होता. लग्नापूर्वी त्यांच्या मुलीने आपले दागिने एका पर्समध्ये ठेऊन ती पर्स आई-वडीलांकडे दिली होती. लग्नानंतर नातेवाईकांचे मोबाईल काढण्यासाठी सुखेंदू दोशी यांनी दागिने आणि रोख रक्कम असलेली पर्स तेथील एका साऊंड बॉक्सवर ठेवली होती. सर्वजण फोटो काढण्यात व्यस्त असल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने ती पर्स लंपास केली.
हेही वाचा - गँगस्टर एजाज लकडावालाला 27 जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी
नातेवाईकांचे फोटो काढल्यानंतर सुखेंदू दोशी यांना साऊंड बॉक्सवर ठेवलेली दागिन्यांची पर्स अज्ञाताने लंपास केल्याचे लक्षात आले. त्यांनी सगळ्यांकडे चौकशी केली. परंतू पर्स सापडली नाही. त्यामुळे त्यांनी गुरूवारी कराड शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरूध्द फिर्याद दिली. अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या चोरीचा तपास करत आहेत.