सातारा: आज राज्यभरातील विविध कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांची मतमोजणी झाली. यापैकी अनेक ठिकाणी अनपेक्षित निकाल लागले आहेत. तर जावळी महाबळेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीचा निकाल जाहीर झाला आहे. जावळी-महाबळेश्वर बाजार समितीवर भाजप आणि राष्ट्रवादी आमदारांच्या पॅनेलने महाविकास आघाडीचा धुव्वा उडवून एकहाती सत्ता राखली आहे. राष्ट्रवादीच्या दोन आमदारांनी भाजप आमदारांना साथ केल्याची तक्रार शरद पवार यांच्याकडे करण्यात आली होती. त्यामुळे या निकालाकडे जावळी आणि महाबळेश्वर तालुक्याचे लक्ष लागले होते.
सहा जागा बिनविरोध, बारा जागा जिंकल्या : सातारा जिल्ह्यातील बाजार समित्यांचा निकाल जाहीर झाला आहे. सातारा-जावळीचे भाजपचे आमदार शिवेंद्रराजे भोसले, वाईचे राष्ट्रवादीचे आमदार मकरंद पाटील आणि राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी विकास पॅनेलने निवडणूक लागलेल्या सर्व १२ जागांवर विजय मिळवला. तत्पूर्वी ६ जागा बिनविरोध झाल्या होत्या. जावळीचे माजी आमदार सदाशिव सपकाळ आणि राष्ट्रवादीचे नेते दीपक पवार यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीच्या पॅनेलचा निवडणुकीत धुव्वा उडाला आहे.
दोन आमदारांविरोधात तक्रार : जावळी-महाबळेश्वर बाजार समितीच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी ९३.८६ टक्के मतदान झाले होते. मतदानाची टक्केवारी जास्त असल्याने निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून होते. राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे व मकरंद पाटील यांनी भाजपचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यासोबत युती केल्याने राष्ट्रवादीचे नेते दीपक पवार यांनी शरद पवार यांच्याकडे तक्रार केली होती.
टीका करणाऱ्यांचाच फुगा फुटला: निवडणुकीच्या प्रचारात माजी आमदार सदाशिव सपकाळ यांनी आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यावर जोरदार टीका केली होती. भाजपचा आमदार म्हणजे हवा भरलेला फुगा आहे. निकालानंतर तो फुटणार आहे, असा हल्लाबोल सपकाळ यांनी केला होता. मात्र, प्रत्यक्ष निकालात सपकाळ यांच्याच पॅनेलचा धुव्वा उडाला. तसेच जावळी, महाबळेश्वर बाजार समितीत महाविकास आघाडी पॅनलचा दारुण पराभव झाला.