सातारा - महामारीची सुरुवात झाल्यानंतर जगाच्या पाठीवर विविध वैद्यकीय संशोधन केंद्रांमध्ये कोरोनावर लस तयार करण्यासाठी प्रयत्न होऊ लागले. बाजारात लस येईपर्यंत रोगप्रतिकारकशक्ती सुधारण्यासाठी डॉक्टरांचे तसेच आहारतज्ज्ञांचे सल्ले घेण्यासाठी लोकांनी गर्दी केली. याच काळात तज्ज्ञांकडून हर्ड इम्युनिटीचा विषय समोर आला. याच संदर्भात डॉ. ब्रम्हनाळकर यांच्याशी 'ईटीव्ही भारत'ने संवाद साधला.
आजार पसरल्यानंतर एकूण लोकसंख्येच्या एकूण किती टक्के लोकांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती तयार झाली, यावर रोगाचा प्रसार थांबण्याचे समीकरण अवलंबून असल्याचे त्यांनी सांगितले. हर्ड इम्युनिटी रोगाच्या संसर्गजन्यतेवर अवलंबून असते, असे ते म्हणाले.
गोवर या आजाराची संसर्गजन्यता(१८-१९) जास्त असल्याने लोकसंख्येच्या ९५ टक्के लोकांमध्ये याविरोधात रोगप्रतिकारक शक्ती तयार व्हावी लागते. मात्र कोरोनाच्या प्रसाराचे प्रमाण या तुलतेन कमी आहे. सद्याची परिस्थिती पाहता कोरोनाचा सामना करण्यासाठी एकूण लोकसंख्येच्या ८० टक्के नागरिकांना प्रदुर्भाव होऊन जाणे अथवा या लोकांचे लसीकरण होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
भारतात याचा प्रयोग यशस्वी होईल का, यावर बोलताना देशातील रोगाचा प्रादुर्भाव होण्याचा दर (केस फर्टिलीटी रेट) आणि मृत्यूदर (मॉर्टेलिटी रेट) यो दोन्हींचे प्रमाण इतर देशांच्या तुलनेत कमी असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. यामुळे तरुण वर्गाचा फायदा होत असल्याचे ते म्हणाले. मात्र, हे सर्वच आजारांच्या बाबतीत शक्य नसते. १९१८-१९१९ साली आलेल्या 'स्पॅनिश फ्लू'मध्ये सर्वाधिक तरुणांचा जीव गेल्याचे त्यांनी सांगितले. मात्र साठीच्या पलिकडे वय असलेल्या तसेच अन्य आजारांनी त्रस्त असलेल्या नागरिकांचा मृत्यू होण्याचे प्रमाण अधिक आहे, असे डॉ. ब्रह्मनाळकर यांनी म्हटले.