कराड ( सातारा ) - भारतीय नौदलात अत्याधुनिक आयएनएस वागशीर पाणबुडी ( INS Vagsheer Submarine ) दाखल झाली असून, नुकतेच तिचे जलावतरण देखील झाले. यामुळे भारतीय नौदलाचे सामर्थ्य आणि हिंद महासागरात भारताचा दबदबाही वाढला आहे. 40 टक्के देशी तंत्रज्ञानावर ही पाणबुडी तयात करण्यात आली आहे. या पाणबुडीत बसविण्यात आलेल्या वातानुकूलित यंत्रणेची निर्मिती ही कराडसारख्या ग्रामीण भागातील श्री रेफ्रिजरेशन इंडस्ट्रिजमध्ये झाली ( Shree Air Conditioning System ) आहे. यामुळे कराडच्या औद्योगिक उत्पादनावर जागतिक दर्जाची मोहोर उमटली आहे.
औद्योगिकरणात कराडमधील उद्योजकाची भरारी - आयएनएस वागशीर ही पाणबुडी नौदलाच्या पाणबुडी प्रोजेक्ट 75 अंतर्गत बांधण्यात आलेली आहे. ही पाणबुडी 40 टक्के देशी तंत्रज्ञानावर आधारित आहे. यात अत्याधुनिक नेव्हीगेश यंत्रणा बसवण्यात आली आहे. वागशीर ही 50 दिवस पाण्याखाली राहू शकते. या पाणबुडीतील वातानुकूलित यंत्रणेसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर निविदा मागवण्यात आल्या होत्या. त्यामध्ये कराडच्या श्री रेफ्रिजरेशनची निविदा मंजूर झाली. यापूर्वी पाणबुडीला फ्रेंच कंपनीची वातानुकूलित यंत्रणा वापरली जात होती. प्रथमच कराडसारख्या ग्रामीण भागातील उद्योजकाच्या कंपनीत तयार झालेल्या वातानुकूलित यंत्रणेचा नौदलाच्या पाणबुडीत वापर करण्यात आला आहे. यामुळे श्री रेफ्रिजरेशन इंडस्ट्रिजचे सीएमडी आर. जी. शेंडे, कार्यकारी संचालिका राजश्री शेंडे आणि कुशल अधिकारी, कर्मचार्यांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
श्री रेफ्रिजरेशनमधील औद्योगिक उपकरणांचा सैन्य दलात वापर - कराड-ओगलेवाडी श्री रेफ्रिजरेशन इंडस्ट्रिज कंपनी विविध औद्योगिक उपकरणांची निर्मिती करत आहे. गेल्या दहा वर्षांपासून कंपनीतील अनेक वातानुकूलित यंत्रणेचा वापर सैन्य दलातील विविध साधनांमध्ये केला जात आहे. नौदलाची जहाजे, पाणबुड्या यामध्येही आता या कंपनीच्या साधनांचा वापर होऊ लागला आहे. यानिमित्ताने कंपनीतील उत्पादनांचा दर्जा जागतिक स्पर्धेत सिद्ध झाला आहे. कंपनीतील अधिकारी आणि कर्मचारी कुशलतेने नाविन्यपूर्ण साधनांच्या निर्मितीसाठी अहोरात्र मेहनत घेत आहेत, अशी प्रतिक्रिया कार्यकारी संचालिका राजश्री शेंडे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना व्यक्त केली.
वागशीर पाणबुडीचे जलावतरण - वागशीर पाणबुडी नौदलात दाखल झाली आहे. संरक्षण सचिव अजय कुमार यांच्या यांच्या हस्ते आयएनएस वागशीरचे माझगाव डॉक यार्डातून जलावतरण करण्यात आले. प्रोजेक्ट 75 अंतर्गत बांधण्यात येणार्या स्कॉर्पियन प्रकारातील पाणबुड्यापैकी 6 व्या पाणबुडीचे नाव आएएनएस वागशीर ठेवले गेले आहे. या पाणबुडीत एन्टी सरफेस वॉरफेअर प्रणाली, एंटी सबमरीन वॉरफेअर प्रणाली, इंटेलिजन्स गॅदरिंग, समुद्र भुसुरंग पेरणे, एरिया सर्वेलन्स या प्रकारच्या आधुनिक यंत्रणांनी परिपूर्ण अशी ही पाणबुडी आहे.