सातारा - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लॉकडाऊन आहे. असे असतानाही लॉकडाऊन डावलून महाबळेश्वरमध्ये आलेल्या उद्योगपती वाधवान कुटुंबावर महाबळेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी वाईच्या विभागीय अधिकारी संगीता चौगुले यांनी तक्रार दिली.
लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणात कपिल वाधवान, अरुणा वाधवान, वनिता वाधवान, धीरज वाधवान, कार्तिक वाधवान, पूजा वाधवान, शत्रुघ्न घाग, मनोज यादव, मनोज शुक्ला, अशोक वाफेलकर, दिवाण सिंग, अमोल मंडळी, लोहित फर्नांडिस, जसप्रीत सिंग, जस्टिन डिमेलो, इंद्रकांत चौधरी, एलिजाबेथ आयपिल्लई, रमेश शर्मा, प्रदीप कांबळे, तारका सरकार यांच्यासह लहान मुलांचा सहभाग असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोरोना विषाणू पार्श्वभूमीवर वाधवान कुटुंबाचा इतर नागरिकांना देखील याचा त्रास होऊ शकतो. असे असतानाही ते मुंबईवरुन महाबळेश्वरमध्ये आले. याबाबत त्यांनी जिल्हा प्रशासनाला कोणतीही माहिती दिली नाही. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.