सातारा - उन्हाची दाहकता वाढू लागल्यामुळे चारा आणि पाण्याच्या शोधात गव्यांनी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातून बाहेर पडायला सुरूवात केली आहे. कराड तालुक्याच्या पश्चिम सीमेवरील पाठरवाडी गावच्या डोंगर पायथ्याला शेतकऱ्यांना गव्यांचे दर्शन झाले. गव्यांच्या वावरामुळे या परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पश्चिम महाराष्ट्राला नैसर्गिक देणगी लाभलेला सह्याद्री पर्वतरांगांचा प्रदेश आहे. याच पर्वतरांगेतील पश्चिम घाटाच्या छायेखालचे कोयना अभयारण्य आणि चांदोली राष्ट्रीय उद्यान परिसर 'सह्यादी व्याघ्र प्रकल्प' म्हणून घोषीत केलेला आहे.
हेही वाचा - कौतुकास्पद ..! पंतप्रधान सहायता निधीत चिमुकल्याने दिली सायकल घेण्यासाठी जमा केलेली रक्कम
चांदोली आणि कोयना अभयारण्यात वाघांचे अस्तित्व आहे. हा परिसर वाघांच्या अस्तित्वासाठी अत्यंत सुरक्षित असल्यामुळे या ठिकाणी सह्याद्री व्याघ्र प्रकल्प झाला. येथे वाघाबरोबरच गवा, चितळ, सांबर, हरीण, बिबटे हे प्राणीही पहायला मिळतात.
उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. या त्यामुळे व्याघ्र प्रकल्पात चारा आणि पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवायला सुरूवात झाली आहे. प्रकल्पातील गव्यांना चारा-पाण्यासाठी बाहेर पडावे लागत आहे. व्याघ्र प्रकल्पातील गव्यांचे दर्शन कराड तालुक्यातील डोंगरी भागात होऊ लागले आहे. कराड तालुक्याच्या पश्चिम सीमेवर असणाऱ्या पाठरवाडी गावच्या डोंगर पायथ्याला दोन गव्यांचे शेतकऱ्यांना दर्शन झाले. डोंगर पायथ्याला आलेल्या दोन गव्यांचे शेतकऱ्यांनी चित्रिकरणसुध्दा केले आहे.