सातारा - कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरू असून गेल्या 24 तासात कोयना धरणाच्या पाणी साठ्यात पावणे चार टीएमसने ( 3.76) वाढ झाली आहे. धुवांधार पावसामुळे धरणात प्रति सेकंद 43,557 क्युसेक पाण्याची आवक होत आहे. धरणातील पाणीसाठा 35.8 टीएमसी झाला आहे.
महाबळेश्वरमध्ये विक्रमी पाऊस - कोयना धरण पाणलोट क्षेत्रात सोमवारी मुसळधार पाऊस पडला आहे. त्यामुळे धरणातील आवक 40 हजार क्युसेकहून अधिक झाली आहे. गेल्या 24 तासात कोयनानगर येथे 161 मिलीमीटर, नवजा येथे 204 मिलीमीटर आणि महाबळेश्वर, येथे सर्वाधिक 246 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे.
घाट क्षेत्रात मुसळधार पावसाचा इशारा - घाट क्षेत्रात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. कोयना धरणाचे पाणलोट क्षेत्राच्या सभोवती असणाऱ्या घाट क्षेत्रात तुफान पर्जन्यवृष्टी होता आहे. त्याचबरोबर पाटण, जावली, महाबळेश्वर, वाई या तालुक्यात देखील दमदार पाऊस कोसळत आहे.
नवजा येथे मुसळधार पाऊस - कोयना धरणातील पाण्याची आवक वाढल्यामुळे पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. चोवीस तासांत धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडल्यामुळे एकाच दिवसात धरणाच्या पाणीसाठ्यात तब्बल 3 टीएमसीने वाढ झाली आहे. पाणलोट क्षेत्रातील कोयनानगर येथे 103 मिलीमीटर, नवजा येथे 162 मिलीमीटर आणि महाबळेश्वर येथे 147 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. यामुळे धरणात तब्बल 2.88 टीएमसी पाण्याची आवक झाली आहे.
पूर्वेकडे पावसाची रिमझिम - सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाची संततधार असताना पुर्वेकडे मात्र दमदार पावसाची प्रतिक्षा आहे. जिल्ह्याच्या पुर्वेकडील भागात अजून रिमझिम पाऊस सुरू आहे. पावसाचा जोर नसल्यामुळे नद्यांची पाणी पातळी इशारा पातळीपेक्षा बरीच खाली आहे. त्यामुळे, नदीकाठी सध्या तरी धोकादायक परिस्थिती नाही. जिल्ह्याच्या पूर्वेकडील भागाला दमदार पावसाची प्रतिक्षा आहे.
एनडीआरएफकडून आज नदीकाठच्या परिस्थितीची पाहणी - संभाव्य पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर कराड आणि पाटण तालुक्यासाठी एनडीआरएफची एक टीम पाठविण्यात आली आहे. ही टीम बुधवारी (दि. 6) कराडमध्ये दाखल झाली आहे. बुधवारी दिवसभर प्रशासकीय अधिकार्यांसमवेत त्यांच्या बैठका सुरू होत्या. कोणत्या प्रकारची आपत्ती उद्भवू शकते, याची एनडीआरएफच्या जवानांनी माहिती घेतली. तसेच, आज सकाळी ही टीम नदीकाठच्या परिस्थितीची पाहणी करणार आहे.
हेही वाचा - OBC Reservation : ओबीसी आरक्षणाबाबत आज सर्वोच्च न्यायालयात महत्वपूर्ण सुनावणी, संपूर्ण देशाचे लक्ष