सातारा - कृष्णा सहकारी साखर कारखान्याने 2019-20 या आर्थिक वर्षातील व्हॅट व जीएसटी करापोटी 86 कोटी 21 लाख रूपयांचा भरणा करत शासनाच्या तिजोरीत मोठी भर घातली आहे. सातारा जिल्ह्यात करापोटीचा हा सर्वाधिक महसूल आहे.
विविध संस्था आणि व्यवसायांच्या माध्यमातून शासनाकडे दरवर्षी मोठी रक्कम कर रुपाने गोळा होत असते. कोरोनाच्या संकटामुळे गेल्या आर्थिक वर्षात सर्वच संस्थांना मोठ्या आर्थिक अडचणीतून जावे लागले. मात्र, कोरोना संकटासारख्या परिस्थितीतही कृष्णा कारखान्याने चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी वाटचाल सुरू ठेवली आहे.
कारखान्याने 2019-20 या आर्थिक वर्षातील व्हॅट करापोटी 77 कोटी 16 लाख आणि जीएसटीपोटी 9 कोटी 5 लाख, असा एकूण 86 कोटी 21 लाख रूपयांचा भरणा केला आहे. सातारा जिल्ह्यात इतक्या मोठ्या रकमेचा महसूल एकट्या कृष्णा कारखान्याने भरल्यामुळे शासनाच्या तिजोरीत मोठी भर पडली आहे.
हेही वाचा - सचिन-वीरूमुळे इंडिया लेजेंड्सचा बांगलादेशवर सहज विजय