सातारा - किरकोळ कारणावरून भांडण होऊन रागाच्या भरात पतीने पत्नीची हत्या केल्याची घटना रविवारी सकाळी मलकापूर येथे उघडकीस आली. मंगल दाजी येडगे असे मृत महिलेचे नाव असून याप्रकरणी पोलिसांनी तिच्या पतीला ताब्यात घेतले आहे.
कराड तालुक्यातील मलकापूरमधील अहिल्यानगर येथील शिवाजी चौक परिसरात येडगे कुटूंब वास्तव्यास आहे. रविवारी सकाळच्या सुमारास येडगे यांच्या शेजाऱ्यांना येडगे यांच्या घरात काहीतरी अघटीत घडल्याचा सुगावा लागला. याबाबतची माहिती स्थानिकांनी पोलिसांनी दिली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी येडगे यांच्या घरात जाऊन पाहिले असता, मंगल येडगे या निपचित पडलेल्या आढळल्या. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे रक्तस्त्राव झाला होता. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला होता.
महिनाभरपासून येडगे दाम्पत्यामध्ये वाद सुरू होता. शनिवारी रात्रीही दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले होते, अशी माहिती पोलिसांना मिळाली. या घरगुती वादातून ही घटना घडली असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, मृत मंगल यांचा भाऊ विलास सोनके यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून पती दाजी येडगेला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरिक्षक सराटे, हवालदार सुनील पन्हाळे, हवालदार बर्गे अधिक तपास करत आहेत.