सातारा - राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री तथा सातार्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या सातारा जिल्ह्यात बेकायदेशीर दारूची खुलेआम विक्री होत असल्याचा प्रकार एका घटनेतून समोर आला आहे. भाडळे गावातील मध्यवर्ती चौकात सुरू असलेल्या बेकायदेशीर दारू अड्ड्यावर चिलेवाडी (ता. कोरेगाव) येथील महिलांनी हल्लाबोल करत संपूर्ण दारूअड्डा उध्दवस्त केला. पत्र्याच्या शेडमध्ये राजरोस दारूविक्री करणार्या विक्रेत्याला महिलांनी चोप देत दारूच्या बाटल्या फोडून टाकल्या. या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
मध्यवर्ती चौकात दारु विक्री : कोरेगाव तालुक्यातील भाडळे गावातील मध्यवर्ती चौकात पत्र्याच्या शेडमध्ये राजरोसपणे अवैध दारू विक्री सुरू होती. त्यामुळे भाडळे, चिलेवाडी, नागेवाडी, हासेवाडी , बोधेवाडी, धनगरवाडी या गावातील ज्येष्ठांबरोबर तरूण वर्ग देखील दारूच्या आहारी गेला होता. या बेकायदेशीर दारू अड्ड्याचा सुगावा लागताच चिलेवाडीतील महिला हातात दांडकी घेऊन भाडळे गावातील दारू अड्ड्यावर आल्या. पत्र्याच्या शेडमध्ये घुसून महिलांनी दारूचे बॉक्स उद्ध्वस्त केले. तसेच महिलांनी दारू विक्रेत्याला दांडक्याने बेदम चोपले.
महिलांच्या दुर्गावताराने विक्रेत्याची तंतरली : अचानक महिलांचा जमाव शेडमध्ये घुसला आणि महिलांनी आक्रमक पवित्राा घेत दारूच्या बाटल्या फोडायला सुरूवात केली. काही महिलांनी दारू विक्रेत्याची कॉलर पकडून त्याला मारायला सुरूवात केली. या झटापटीत त्याच्या शर्टाची बटने तुटली. महिलांनी दारू विक्रेत्याला हाताने, दांडक्यांनी चोपायला सुरूवात केली. महिलांच्या या दुर्गावताराने विक्रेत्याची चांगलीच तंतरली. चांगला चोप दिल्यानंतर दारू विक्रेत्याला उपरती आली. पुन्हा दारू विक्री करणार नाही, अशी हमी दिल्यानंतर महिलांनी त्याला सोडून दिले.
मद्यपींची उडाली तारांबळ : अचानक महिलांनी हल्लाबोल केल्याने दारू पिण्यासाठी आलेल्या मद्यपींनी वाट दिसेल तिकडे पळायला सुरूवात केली. मद्यपी पळून गेले पण दारू विक्रेता महिलांच्या तावडीत सापडला. पत्र्याच्या शेडमधील दारूच्या बाटल्या फोडताना आणि दारू विक्रेत्याला चोपतानाचा व्हिडिओ एका तरूणाने मोबाईलमध्ये चित्रित केला. घटनेनंतर तो सोशल मीडियावर व्हायरल होताच कोरेगाव तालुक्यात खळबळ उडाली. रणरागिणींचा दुर्गावतार पाहून अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत. तसेच पोलीस आणि उत्पादन शुल्क खात्याची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत.