सातारा : मेढा येथील गांधीनगर वसाहतीत कातकरी कुटुंबातील दाम्पत्याने दारूच्या नशेत विषारी औषध प्राशन केले. यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. त्या दोघांचे मृतदेह झोपडीत आढळून आले. यामुळे या परिसरात खळबळ उडाली आहे. ते दोघेही दारू प्यायले होते, असे समजते आहे. अनिल शिवराम काटेकर (वय ४२) आणि शेवंता काटेकर (वय ३५) असे या पती-पत्नीचे नाव आहे. काल संध्याकाळी ही घटना समोर आली.
हेही वाचा - फडणवीस सरकारमध्ये आरएसएसचा किती वाटा होता; नाना पटोलेंचा पलटवार
बहिणीमुळे समोर आली घटना-
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मेढ्यातील गांधीनगर वसाहतीतील अनिल व शेवंता हे दोघे नवरा बायको मोलमजुरी करून उदरनिर्वाह करीत होते. या दोघांनाही दारूचे व्यसन होते. काल सकाळपासून दोघेही दारू प्यायले होते. सायंकाळी अनिलची बहीण त्यांची चौकशी करण्यासाठी गेली होती. यावेळी अनिल आणि शेवंता हे दोघेही मृतावस्थेत आढळून आले.
हेही वाचा - सोलापुरातील मार्कंडेय सहकारी रुग्णालयात गॅस टाकीचा स्फोट
मेढा पोलिसांत नोंद -
दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी मेढा ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले आहेत. पोलिसांना त्यांच्या मृतदेहाजवळ औषधांची पाकिटे सापडली आहेत. त्यामुळे दारूच्या नशेत त्यांनी ही औषधे घेतल्याने अथवा दारूच्या अती सेवनाने या नवरा-बायकोचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. दरम्यान, आकस्मित मृत्यू म्हणून पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल माने या घटनेचा अधिक तपास करत आहेत.