सातारा - माण तालुक्यातील दहिवडी बसस्थानकात पुन्हा एकदा माणदेशी महिलेच्या प्रामाणिकपणाचा प्रत्यय आला. एका महिलेने सापडलेले अडीच तोळे वजनाचे सोन्याचे गंठण परत केले आहे.
बुधवार 25 डिसेंबरला सायंकाळी साडेसहाच्या सुमारास येथील अर्चना काशीद या आपल्या मुलाला आटपाडीला जाणाऱया बसमध्ये बसविण्यासाठी दहिवडी बसस्थानकात आल्या होत्या. बस येण्यासाठी वेळ असल्यामुळे त्या मुलासह बसची वाट बघत स्वच्छतागृहालगतच्या फलाटावर थांबल्या होत्या. बसस्थानकात मुक्कामी जाणाऱ्या तसेच लांब पल्ल्याच्या बस पकडण्यासाठी प्रवाशांनी गर्दी केली होती. साधारण पावणेसात वाजता अर्चना काशीद यांना तेथील खांबाच्या सावलीत अंधुकशा उजेडात कागदाच्या पुडीत काहीतरी चमकताना दिसले. त्यांनी ती पुडी उचलून पाहिली असता त्यात सोन्याचे गंठण असल्याचे आढळून आले. त्यांनी तत्काळ ते गंठण बसस्थानकात असलेल्या पोलीस मदत केंद्रात उपस्थित असलेल्या गृहरक्षक दलाचे अमित कुंभार, महेश खरात यांच्याकडे दिले. पोलीस शिपाई गणेश पवार यांनी ही माहिती दहिवडी पोलीस ठाण्यात दिली.
हेही वाचा - चंद्रपुरातील आदिवासी माना जमातीचा नागदिवाळी उत्सव, 'असा' करतात साजरा
यानंतर तासाभरात वावरहिरे (ता. माण) येथील सुनंदा कापसे यांचा दहिवडी पोलीस ठाण्यात अडीच तोळ्याचे सोन्याचे गंठण गहाळ झाल्याबाबतचा फोन आला. पोलीस कर्मचाऱ्यांनी संपूर्ण चौकशी केली असता अर्चना काशीद यांना सापडलेले सोन्याचे गंठण सुनंदा कापसे यांचेच असल्याचे खात्री पटली. सुनंदा कापसे या मुंबईला जाण्यासाठी दहिवडी बसस्थानकात आल्या होत्या. त्यावेळी त्यांच्याकडून सदर सोन्याचे गंठण ठेवलेली पुडी गहाळ झाली होती.
हेही वाचा - 'व्यायाम करा, धान्य दळा', दिल्लीमध्ये अनोख्या पिठाच्या गिरणीचा शोध
गुरुवारी सकाळी अर्चना काशीद आणि सुनंदा कापसे यांना दहिवडी पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले. सोन्याचे गंठण परत मिळाल्याने सुनंदा कापसे यांना आनंदाश्रू अनावर झाले. त्यांनी अर्चना काशीद यांचे मनापासून आभार मानले. तसेच त्यांना प्रेमाने साडी देवून त्यांचे आभार मानले. स्वतः लघु उद्योग चालवून घरखर्च भागविणाऱ्या अर्चना काशीद या गृहिणीच्या प्रामाणिकपणाला दहिवडी पोलीसांनीही सलाम केला. सहाय्यक पोलिस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांनी अर्चना काशीद यांचा यथोचित सत्कार केला. यावेळी पोलीस कर्मचारी उपस्थित होते.