सातारा - सदर बाजार येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर परिसरात मास्क का लावला नाही, अशी विचारणा करणाऱ्या होमगार्डला जमावाने बेदम मारहाण केली. ही घटना गुरुवारी दुपारी सव्वाबाराच्या दरम्यान घडली.
विश्वनाथ मामणे असे जखमी जवानाचे नाव असून त्यांच्या तोंडाला व हाताला दुखापत झाली आहे. त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी शहर पोलिसांनी १५ जणांसह तीन महिलांना ताब्यात घेतले आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी, लॉकडाऊन आणि अत्यावश्यक सेवांवर देखरेख करण्यासाठी शहरात ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. सदर बाजार कॅनॉलनजीक डॉ. बाबासाहेब आंबेडकर गृहनिर्माण वसाहत परिसरात बंदोबस्तावर होमगार्ड तैनात करण्यात आला होता. होमगार्ड विश्वनाथ मामणे येथे कर्तव्यावर होते. दुपारी सव्वाबाराच्या दरम्यान एक युवक तेथून चालत जात असताना मामणे यांनी त्याला मास्क का लावला नाही, अशी विचारणा केली. संबंधित युवक पुन्हा जमाव घेऊन तेथे आला. त्यांनी मामणे यांना मारहाण केली. या मारहाणीत त्यांच्या तोंडाला दुखापत झाली. जमावाच्या या कृत्यामुळे तेथे तणावाचे वातावरण निर्माण झाले .
पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतले. यामध्ये 15 पुरुष व 3 महिलांचा समावेश आहे. या प्रकरणातील दोषींचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करणार असल्याचे समीर शेख यांनी सांगितले.