सातारा - कृष्णा नदीवरील जुना पूल कोसळल्याने नवीन पुलावरील वाहतुकीत वाढ झाली आहे. त्यात पुलावर आणि रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहतुकीची कोंडी होत आहे. या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला जाग आली. आज (बुधवार) अधिकार्यांनी तातडीने रस्त्यासह वाहतूक कोंडीची पाहणी केली आणि येत्या ८ दिवसात रस्त्यांच्या दुरुस्तीसह इतर समस्यांचे निराकरण करण्यात येणार असल्याची ग्वाही दिली.
कराड-विटा मार्गावर असलेल्या कृष्णा नदीवरील जुना पूल कोसळल्याने नवीन पुलावर वाहतुकीचा ताण वाढला आहे. त्यातच पुलावर आणि रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहतुकीची कोंडी होत आहे. या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आंदोलनाचा इशारा दिला होता. या इशाऱ्याची दखल राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने घेतली आणि रस्त्याची पाहणी केली.
रस्ताच्या अवस्था पाहून अधिकाऱ्यांनी येत्या आठ दिवसात रस्ता दुरुस्त करण्याचे आश्वासन दिले. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे उप-कार्यकारी अभियंता रमेश पन्हाळकर, मनसेचे जिल्हाध्यक्ष अॅड. विकास पवार, शहराध्यक्ष सागर बर्गे यांनी प्रत्यक्ष पाहणी दौरा केला.
शाळा आणि महाविद्यालयांमुळे विद्यानगर हे शैक्षणिक 'हब' बनले आहे. त्यामुळे या मार्गावरून दररोज हजारो विद्यार्थी ये-जा करतात. यंदा ऑक्टोबरच्या अखेरपर्यंत पाऊस पडला. त्यामुळे रस्ते अनेक ठिकाणी खराब झाले आहेत. खराब रस्त्यामुळे वाहतूक कोंडीसह अपघाताच्या घटना वाढल्या आहेत. नव्या कृष्णा पुलावर खड्डेच खड्डे आहेत. याकडे कोणीही लक्ष न दिल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तीव्र आंदोलनाचा इशारा दिला होता.
हेही वाचा - मायणी अभयारण्यात चंदन चोरीला उधाण, अज्ञातांकडून चंदनाच्या झाडावर कुऱ्हाड
हेही वाचा - मद्यपी कारचालकाचा सातारा-पंढरपूर महामार्गावर थरार; 13 जणांना धडक