सातारा - गेल्या चोवीस तासांमध्ये कोकण आणि मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने पावसाची दीर्घ प्रतीक्षा करणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. तर सातारा जिल्ह्यातील गंभीर दुष्काळी जाहीर झालेल्या भागात आज (सोमवारी) पावसाने जोरदार हजेरी लावली.
माण-खटाव तालुक्यातील मार्डी, राणंद, झाशी, पळशी, दहिवडी या ठिकाणी तर खटाव तालुक्यातील वडूज, कातरखटाव, औंध परिसरात देखील जोरदार पाऊस झाला. तर काही ठिकणी तुरळक पाऊस झाला. त्यामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे. पावसामुळे येथील अनेक ओढे, नाले दुथडी भरून वाहत आहेत.
नैर्ऋत्य मोसमी पावसाला यंदा चक्रीवादळासह विविध अडथळ्यांचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे मान्सून राज्यात पोहोचण्यासाठी 20 जूनपर्यंतची वाट पाहावी लागली. त्यानंतर आता पावसाला सुरूवात झाली आहे. अशाच अनेक मोठ्या पावसांची दुष्काळी भागाला गरज आहे.