सातारा - शासनाने गंभीर दुष्काळ झाहिर केलेल्या माण, खटाव, कोरेगाव, फलटण तालुक्याला परतीच्या पावसाने जोराची हजेरी लावल्याने माणगंगा, बाणगंगा व यरळा नदीला पूर आला आहे. आंधळी आणि नेर धरण पूर्ण क्षमतेने भरली आहेत. आंधळी धरणाच्या सांडव्यातून पाणी मोठ्या प्रमाणावर वाहत असल्याने तलावाच्या पात्रातून खाली असणाऱ्या बोडके गावची स्मशानभूमी त्या पाण्याने वाहून गेली.नदीवरील पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद झाली आहे.
दहिवडी मधून मार्डी आणि रानंद गाकडे जाणाऱ्या पुलावरून पाणी वाहत असल्याने ती वाहतूक बंद झाली असून इथेही स्मशानभूमी पाण्यात गेली आहे. तीर्थक्षेत्र गोंदवले बुद्रुक येथील ही कवट वस्तीकडे जाणारा पूल पाण्याखाली गेल्याने तो ही रस्ता बंद झाला आहे. सकाळी दहिवडी फलटण रस्ता देखील काही तास बंद होता. एकंदरीतच दुष्काळी माण, खटाव, फलटण कोरेगाव तालुक्यात वरुण राजाने कृपादृष्टी केल्याने शेतकरी सुखावला असून माण मधील पाणी टंचाई दूर होण्यास मदत होणार आहे.