सातारा - जिल्ह्यात परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे बंधारे खचले आहेत. तर, काही ठिकाणी वाहूनही गेले आहेत. दोन ते तीन महिन्यांपूर्वी जिल्ह्यातील पाटण, कराड या भागात पूरस्थिती निर्माण झाली होती. तर पूर्व भागात 62 चारा छावण्या व 180 पाण्याचे टँकर चालू होते. त्यामुळे जिल्ह्यातील निसर्गाचा खेळ पहायला मिळाला होता.
परतीच्या पावसाने दुष्काळी माण, खटाव, फलटण, कोरेगाव या तालुक्याला झोडपून काढले आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरडा दुष्काळ आणि आता ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत आहे.
या पावसाने माण तालुक्यातील सगळे तलाव, बंधारे भरून वाहिले आहेत. रविवारी रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या पावसाने पिंगळी तलावाच्या खालच्या बाजूचे बंधारे खचले आहेत. काही ठिकाणी बंधारे वाहूनही गेले आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी शेतीचे तसेच पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
दरम्यान, याकडे प्रशासनाने तत्काळ लक्ष देणे गरजेचे आहे. तसेच अनेक ठिकाणी तलाव व बंधारे कोणत्या विभागाचे आहेत, हे देखील नागरिकांना माहिती नाही. यामुळे संबंधित विभागाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.