सातारा - माण-खटाव तालुक्यात नुकत्याच झालेल्या पावसामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. तालुक्याच्या पूर्व भागात मुसळधार पडलेल्या पावसामुळे नदी व ओढे तुडुंब भरून वाहत आहेत. नदीकाठच्या गावांत मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले असून द्राक्ष व डाळींब बागांना याचा लाखोंचा फटका बसला आहे.
माण तालुक्याच्या पूर्व भागात कांद्याच्या पिकाचे नुकसान झाले असून कांद्याचे पीक वाया गेले आहे. म्हसवड परिसरात सलग तीन दिवस झालेल्या पावसाने ओढ्याला पाणी आले असून काही प्रमाणात वाहतूक ठप्प झाली आहे. नदीच्या पात्रातील कोल्हापूर टाईप बंधारे तुडुंब भरले आहेत. राजेवाडीचा तलाव भरून वाहू लागला आहे. पळसावडे लिंगीवरे या रस्त्यावर असलेले पूल पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे या परिसरातील वाहतूक ठप्प आहे. लिहून गावामध्ये एक दुचाकीस्वार वाहून गेल्याची घटना घडली. सुदैवानं दुचाकीस्वार वाचला असून दुचाकी मात्र वाहून गेली.
म्हसवडमधील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामध्ये गहू, बाजरी, मका, भुईमूग या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानीचे पंचनामे करून शासनाने तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शिवसेनेतर्फे करण्यात आली आहे. पावसाने माण तालुक्यातील फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नरवणे, गोंदवले, पळसावडे, धुळदेव, देवापुर, भागातही नुकसान झाली आहे. डाळींब व द्राक्षाच्या बागांना पावसाचा लाखो रुपयांचा तडाखा बसला आहे.
सलग तीन वर्षे माण तालुक्यात दुष्काळ पडला होता. यावर्षी पुरेसा पाऊस पडल्याने शेतकरी सुखावला होता. मात्र कोरड्या दुष्काळानंतर आता ओल्या दुष्काळाने डाळींब व द्राक्ष बागांना दणका बसला आहे. शेतातील ऊस उन्मळून पडल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले आहे, असे देवापूर येथील शेतकरी विलास बाबर म्हणाले.
शेतीपिकांच्या नुकसानीबाबत संयुक्त पंचनामे करुन 33 टक्के पेक्षा अधिक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 13 मे 2015 च्या शासन निर्णयात विहित केलेल्या दराने मदत देण्यासाठी अहवाल सादर करावा. येणाऱ्या प्रस्तावामध्ये एकाच लाभार्थ्यासाठी मदतीची द्विरुक्ती होणार नाही, याची दक्षता घ्यावी. तसेच अहवाल तात्काळ सादर करावा, असे आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी आज तहसीलदारांना दिले.