सातारा- कोरोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणामुळे संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात आला आहे. यात देशातील नागरिक कोरोनाला अटकाव करण्यासाठी घरीच थांबून आहेत. त्यामुळे, केंद्र सरकारकडून नागरिकांना तीन महिन्याचे नियमितचे धान्य व अतिरिक्त धान्य वाटप केले जात आहे. मात्र, धान्य वाटपात जिल्ह्यातील अनेक रेशन दुकानदार व अधिकारी गैरव्यवहार करत असल्याचे दिसून आले आहे. माण तालुक्यातील वावरहिरे या गावात नागरिकांना ठरल्यापेक्षा कमी रेशन दिले जात आहे.
वावरहिरे या गावात सरकारमान्य रेशनचे दुकान आहे. मात्र, दुकानात रेशन घेताना नागरिकांना शासनाने प्रति व्यक्ती ठरवलेले रेशन न देता त्यांना कमी रेशन दिले जात आहे. त्याचबरोबर, दुकानदाराकडून लाभार्थ्यांना रेशनचे बिल देखील दिले जात नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे, यात सामान्य जनतेची फसवणूक होत असून सामान्य, गोरगरिबांसाठी अन्नाची व्यवस्था करणाऱ्या सरकारचीही फसवणूक होत आहे. ही आर्थिक लूट त्वरित थांबवण्याची मागणी वावरहिरे गावचे सरपंच चंद्रकांत वाघ यांनी केली आहे.
हेही वाचा- काळाबाजार भोवला, कराडमधील रेशनिंग दुकानदाराचा परवाना कायमस्वरूपी रद्द