सातारा - कोरोनाच्या संकटात नागरिकांना बाहेर पडण्यावर मर्यादा आहेत. ही गोष्ट लक्षात घेवून खरीप हंगामासाठी लागणारे बी-बियाणे व खते यांच्यापासून कोणाताही शेतकरी वंचित राहू नये. यासाठी बांधावर जाऊन बियाणांचे वाटप करण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या बांधावर जावून बि-बियाणे खते दिले जात आहेत, असे प्रतिपादन सहकार, पणन तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी आज(गुरुवार) केले.
जिल्ह्याच्या कराड तालुक्यातील उंब्रज मंडळातील निगडी गावच्या शिवारात आज पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते शेतकऱ्यांना बी-बियाणांचे व खतांचे वाटप करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे शिक्षण व अर्थ समितीचे सभापती मानसिंगराव जगदाळे, कराडचे तहसीलदार अमरदीप वाकडे, कराड पंचायत समितीचे सभापती प्रणव ताटे, प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजयकुमार राऊत, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी विनायक पवार आदी उपस्थित होते.
लॉकडाऊनच्या काळातही राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे सर्व व्यवहार सुरळीत चालू ठेवण्यावर शासनाने भर दिला होता. असे सांगून पालकमंत्री पाटील म्हणाले, या काळात महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये दररोज हजारो क्विंटल भाजीपाल्याची आवक झाली होती. आवक झालेला भाजीपाला विविध माध्यमातून लोकांच्या दारापर्यंत पोहचत होता. ही व्यवस्था चालू राहील ती केवळ शेतकऱ्यांमुळेच.
पालकमंत्र्यांनी घेतली बीज प्रक्रिया उद्योगाची माहिती
दरम्यान, लागणीनंतर आठ ते दहा दिवसांमध्ये सोयाबीन पिकावर खोड माशी, खोड किडे यांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. त्यामुळे रायजोबियमच्या सहाय्याने बियाणांवर प्रक्रिया करुन ते लागण करण्यायोग्य तयार करण्याच्या कृषी विभागाकडून चालू प्रक्रियेची पालकमंत्री पाटील यांनी माहिती घेतली. तसेच या प्रकारे प्रक्रिया केलेले ३०० क्विंटल बियाणे वाटप केल्याचेही कृषी अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.