सातारा - सातारा व सांगली जिल्ह्यातील सिंचन विभागांनी आपापसात समन्वय ठेवून प्रकल्पीय तरतुदींनुसार, सातारा व सांगली जिल्ह्यातील कालव्यांना योग्य वेळी पाणी सोडावे, कोणत्याही लाभधारक शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशा सूचना सहकार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केल्या आहेत.
कालवा सल्लागार समितीची बैठक आज सहकार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीला सांगलीचे खासदार संजय पाटील, आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार मकरंद पाटील, आमदार दीपक चव्हाण, आमदार अनिल बाबर, आमदार सुमनताई पाटील, जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, सातारा सिंचन मंडळाचे अधीक्षक अभियंता संजय डोईफोडे, सांगली सिंचन मंडळाचे अधीक्षक अभियंता मिसाळ, कालवा सल्लागार समितीचे सदस्य अरुण लाड यांच्यासह सातारा व सांगली जिल्ह्यातील सदस्य उपस्थित होते.
धरणाचे अतिरिक्त पाणी नदीत सोडण्याऐवजी माण-खटावकडे सोडण्यात यावे. त्या पाण्याची गणना त्यांना ठरवून दिलेल्या कोट्यामध्ये करु नये, असे सांगून पालकमंत्री पाटील पुढे म्हणाले, 1 सप्टेंबरपासून ठरवून दिल्याप्रमाणे सांगलीसाठी आवर्तन सुरू करावे. तसेच, सातारा तालुक्यातील रखडलेल्या सिंचनाचे काम लवकरात लवकर मार्गी लावावे.
दोन-तीन दिवसापासून जिल्ह्यात समाधानकारक पाऊस पडत आहे, सातारा, सांगली जिल्ह्यातील कुठल्याही लाभधारक शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही, अशा प्रकारे आवर्तनाचे नियोजन करावे. प्रकल्पीय तरतुदीनुसार कोट्यानुसार प्रत्येक भागाला पाणी दिले जावे, असे पाटील यांनी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत सांगितले.