सातारा - पोवई नाक्यावर सुमारे ७५ कोटी रुपये खर्चुन बांधलेल्या ग्रेडसेपरेटरचे राज्यसभा सदस्य उदयनराजे भोसले यांनी शुक्रवारी अचानक पाहणी करत त्या कामाचे फित कापून उद्घाटन केले. कोणत्याही अधिका-यांविना, सातारा विकास आघाडी पदाधिका-यांच्या उपस्थितीत हे उद्घाटन करण्यात आले.
ग्रेड सेपरेटर कशासाठी
अपुरा रस्ता, वाहणांची वाढती संख्या, त्यामुळे होणारी वाहतूकीची कोंडी यामुळे पोवई नाक्यावर ग्रेडसेपरेटर उभारणीला सुरुवात झाली. गेले २ वर्षे हे काम सुरु होते. रयत शिक्षण संस्था, बस स्थानक, कोरेगाव व कराड या मार्गावर विना अडथळा वाहतूकीसाठी या ग्रेडसेपरेटरचा उपयोग होणार आहे.
उदयनराजे भोसले बोलताना.... उद्घाटनाची प्रतिक्षाकेंद्रीय मार्ग निधीतून साता-यात ग्रेड सेपरेटरचे काम करण्यात येत आहे. या कामाचा ७५ कोटी रुपये अंदाजित खर्च आहे. फेब्रुवारी २०१८ मध्ये कामास सुरुवात झाली. या कामामुळे वाहतूक कोंडी, पार्किंगची गैरसोय, प्रचंड धुळ याचा त्रास सातारकरांना सहन करावा लागला. पोवई नाका परिसरातील व्यावसायिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. हे काम पुर्ण झाले असले तरी ते उद्घाटनाच्या प्रतिक्षेत आहे. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते उद्घाटन होणार असल्याचे सांगितले जात होते. मात्र तारीख निश्चित होत नव्हती.
पाहणी करायला आले अन्..
खासदार उदयनराजे भोसले शुक्रवारी १० वाजता ग्रेटसेपरेटरची पाहणी करणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र त्याठिकाणी फित कापून उदयनराजेंनी थेट उद्घाटन झाल्याचे जाहीर केले. यावेळी नगराध्यक्षा माधवी कदम, उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, अॅड. दत्ता बनकर तसेच सातारा विकास आघाडीचे नगरसेवक व कार्यकर्ते उपस्थित होते.
अशी असेल नवी व्यवस्था
गोडोलकडून येऊन फक्त बस स्थानकाकडे जाऊ इच्छिणारी वाहने ग्रेड सेपरेटरच्या जमिनीअंतर्गत बोगद्यातून (लांबी 200 मीटर) जातील. राजपथावरून येऊन बस स्थानकाकडे जाऊ इच्छिणाऱ्या वाहनांसाठीही जमिनीअंतर्गत बोगद्याचा (लांबी 100 मीटर) वापर करता येईल. शिवाय बस स्थानकाकडून येऊन केवळ कोरेगाव व कराडच्या दिशेनेच जाणाऱ्या वाहनांसाठी बोगद्याचा वापर करता येईल. उर्वरित रस्त्यांवरून व दिशेने होणारी वाहतूक ही नेहमीच्या रस्त्याने होईल.
हे होणार फायदे
- मार्गावरील वाहतूक होणार सुलभ
- राजपथावरून बस स्थानकाकडे जाणे अधिक सोपे
- सुलभ वाहतुकीमुळे कोंडीचा प्रश्न निकाली
- अडथळे दूर झाल्याने मार्गावरील जलद वाहतूक शक्य
- चारही रस्त्यांवरील 50 टक्के वाहतूक ग्रेड सेपरेटरमुळे कमी होणार