सातारा - महामार्गावरून पायपीट करत आपल्या गावाकडे जाणार्या लोकांना कराड तालुक्याच्या हद्दीत थांबविले जात आहे. शासनाने अशा लोकांच्या राहण्याची आणि जेवणाची सोय देखील केली आहे. महामार्गाच्या कडेला असलेल्या विराज मंगल कार्यालयात त्यांना थांबविले आहे. तेथे त्यांची सर्व सोय करण्यात आली आहे. त्यामुळे पायपीट करणार्यांना दिलासा मिळाला आहे.
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने संचारबंदी लागू केली आहे. काम-धंद्यानिमित्त महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये परराज्यातून आणि परजिल्ह्यातून लोकं आलेले आहेत. हातावर पोट असणारे हे लोक संचारबंदीमुळे अडकून पडले आहेत. त्यामुळे, आपल्या गावी पायी जाण्याचा मार्ग त्यांनी स्वीकारला आहे.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ वरून जाणाऱ्या अशा लोकांची राहण्याची व जेवणाची सोय कराड तालुक्यातील आटके गावाच्या हद्दीतील विराज मंगल कार्यालायात शासनाच्यावतीने करण्यात आली आहे. या लोकांच्या आरोग्यासंदर्भातील सोयी-सुविधांची पाहणी राज्याचे सहकार मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार बाळासाहेब पाटील यांनी केली. त्यांच्या समवेत प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार अमरदीप वाकडे हे ही मदत करत आहेत.