सातारा : खाशाबा जाधव हे स्वतंत्र भारतातील पहिले ऑलिंपिक पदक विजेते कुस्तीगीर होते. १९५२ साली हेलसिंकी ऑलिंपिकमध्ये फ्री स्टाईल कुस्ती या वैयक्तिक क्रीडा प्रकारात त्यांनी कांस्यपदक पटकावत भारताचे नाव जगात उंचावले होते. भारतासाठी स्वातंत्र्योत्तर काळातले ते पहिले वैयक्तिक ऑलिंपिक पदक विजेते होते. खाशाबा जाधव यांचा जन्म १५ जानेवारी १९२६ रोजी कराड तालुक्यातील गोळेश्वर या गावात झाला. त्यांच्या कुटुंबाला कुस्तीचा वारसा होता. मल्लविद्या आणि शिक्षणासाठी ते कुस्तीची पंढरी असलेल्या कोल्हापूरला गेले. पुढे कोल्हापूरच त्यांना ऑलिंपिकपर्यंत घेऊन गेले. त्यांची मेहनत आणि जिद्द त्यांना पदकापर्यंत घेऊन गेली. खाशाबांनंतर ऑलिंपिकमध्ये तब्बल ४४ वर्षांनी भारताला वैयक्तिक पदक मिळाले.
खाशाबांसाठी प्राचार्यांनी घर गहाण ठेवले : ऑलिंपिकला जाण्यासाठी मोठा खर्च होता. त्यासाठी गोळेश्वर ग्रामस्थांनी लोकवर्गणी जमा केली. खाशाबा कोल्हापूरच्या राजाराम महाविद्यालयात शिकत होते. त्या महाविद्यालयाचे प्राचार्य बॅरिष्टर बाळासाहेब खर्डेकर यांनी रहाते घर कोल्हापुरातील मराठा बँकेकडे गहाण ठेऊन ७ हजार रुपये दिले. कोल्हापूरच्या महाराजांनीही खशाबा जाधवांना मदत केली.
मरणोत्तर पद्म पुरस्कारापासून वंचित : देशाला पहिले ऑलिंपिक पदक मिळवून देणाऱ्या खाशाबा जाधव यांचा मरणोत्तर पद्म पुरस्काराने गौरव व्हावा, यासाठी तमाम कुस्तीगीर आग्रही आहेत. त्यासाठी देश पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. मात्र, केंद्र सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही. सरकारला खाशाबांच्या ऑलिंपिक पदकाचा विसर पडल्याची खंत कुस्तीगीरांच्या मनात आहे. ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिलेवहिले वैयक्तिक पदक मिळवून देण्याचा मान खाशाबा यांच्या नावावर आहे. मात्र या पदकाचा रंग चंदेरी किंवा सोनेरी असू शकला असता मात्र ऑलिम्पिक स्पर्धा संपायला आलेली, पदकाची आशा नाही अशा वातावरणात भारतीय व्यवस्थापन गाफील राहिले.
सरकारकडून, संबंधित खेळाच्या संघटनेकडून आर्थिक मदत : गेल्या काही वर्षात ऑलिम्पिकवारी करू शकतील अशा संभाव्य गुणी खेळाडूंना सरकारकडून, संबंधित खेळाच्या संघटनेकडून आर्थिक मदत मिळते.परदेशी प्रशिक्षणासाठी पाठवले जाते. फिजिओ, ट्रेनर, सायकॉलॉजिस्ट मदतीला असतात. खाशाबा यांच्यावेळची परिस्थिती दुर्दम्य अशी होती. खाशाबा ज्या राजाराम महाविद्यालयात शिकत होते तिथले प्राध्यापक खर्डीकर यांनी राहते घर गहाण टाकून सात हजार रुपये उभे केले. एका बँकेकडून सहा हजारांचे कर्ज घेतले आणि त्यातून ही हेलसिंकी वारी शक्य झाली.