सातारा - छत्रपती राजघराण्याच्या स्नुषा चंद्रलेखाराजे शिवाजीराजे भोसले यांच्या पार्थिवावर आज शोकाकूल वातावरणात संगम माहुली येथील राजघाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे नातू कौस्तुभादित्यराजे पवार यांनी पार्थिवाला अग्नी दिला.
चंद्रलेखाराजे भोसले पंचत्वात विलीन, माहुलीच्या राजघाटावर नातवाने दिला अग्नी काल (रविवारी) दुपारी चंद्रलेखाराजे भोसले (वय ७२) यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. आज सकाळी ९ वाजता त्यांच्या 'अदालत वाडा' या राजप्रासादातून अंत्ययात्रा सुरू झाली. सजवलेल्या पालखीत त्यांचे पार्थिव ठेवण्यात आले होते. ही पालखी फुलांनी सजवलेल्या ट्रकमध्ये ठेवण्यात आली होती. शाहूरस्ता मार्गे नगरपालिका व तेथून पोवईनाकामार्गे संगम माहुली अशी अंत्ययात्रा काढण्यात आली.
चंद्रलेखाराजे भोसले पंचत्वात विलीन, माहुलीच्या राजघाटावर नातवाने दिला अग्नी माहुलीच्या राजघाटावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. ज्येष्ठ नेते शिवाजीराजे भोसले, खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, चंद्रलेखाराजे यांचे बंधू माजी खासदार सत्यजीतसिंह गायकवाड तसेच राजघराण्यातील स्नेही व सातारकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चंद्रलेखाराजे भोसले पंचत्वात विलीन, माहुलीच्या राजघाटावर नातवाने दिला अग्नी अल्प परिचय गुजरात येथील बडोदा शहरातील महाराजा सयाजीराव गायकवाड घराण्यात जन्मलेल्या चंद्रलेखाराजे यांनी होम सायन्समधून पदवी घेतली होती. महाविद्यालयीन जीवनात त्यांनी विविध क्रीडा प्रकारात नैपुण्य मिळवले होते. शिवाजीराजे भोसले यांच्याशी विवाह झाल्यानंतर त्या साताऱ्यात आल्या. त्यांचे निवासस्थान असलेला अदालत राजवाडा हाच त्यांच्या सामाजिक उपक्रमाचा केंद्रबिंदू अखेरपर्यंत राहिला. पश्चिम महाराष्ट्रातील विविध सामाजिक, शैक्षणिक आणि धार्मिक संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध होता. काही संस्थावर त्यांनी स्वत: प्रतिनिधित्व केले. महिला मंडळाची शाळा, विविध सामाजिक संस्थांच्या उभारणीत त्यांचा मोठा वाटा होता. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या अजिंक्यतारा किल्ल्यावर शिवसृष्टी उभी रहावी. तसेच त्याठिकाणी छत्रपती शाहू महाराज यांचे उचित स्मारक उभे रहावे, अशी त्यांची इच्छा होती. त्यासाठी त्या अखेरपर्यंत प्रयत्नशिल राहिल्या.