सातारा - नगरपालिकेतील घंटागाडी ठेक्याची अनामत रक्कम परत करण्यासाठी सव्वादोन लाखांची लाच घेऊन आरोग्य निरिक्षक झाला होता. हा फरार आरोग्य निरीक्षक राजेंद्र कायगुडे आज स्वत:हून लाच लुचपत प्रतिबंधक विभागाला शरण आला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
सातारा नगरपालिकेत 8 जूनला २ लाख ३० हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी उपमुख्याधिकारी संचित धुमाळ, आरोग्य निरीक्षक प्रवीण यादव व गणेश टोपे यांना अटक झाली होती. मात्र, राजेंद्र कायगुडे हा फरार झाला होता. तिन्ही आरोपींना दोन दिवसांपूर्वी जामिनावर मुक्तता झाली. यातील चौथा फरार आरोपी पकडण्याचे पोलिसांपुढे आव्हान होते. कायगुडेच्या शोधासाठी पोलिसांनी तीन पथकेही केली होती. दरम्यान, आज दुपारी कायगुडे स्वत:हून लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या सदरबझार येथील कार्यालयात हजर झाला. उद्या त्याला न्यायालयापुढे हजर केले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पालिकेचा उपमुख्याधिकारी संचित धुमाळ याच्यासह आरोग्य विभागातील अन्य दोन अधिकाऱ्यांना पुणे विभागीय आयुक्त कार्यालयाने निलंबित केले आहे. धुमाळच्या निलंबनाच्या अनुषंगाने मुख्याधिकारी गोरे यांनी राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठवला होता. त्यावर राज्य सरकारने तत्काळ पुणे विभागीय आयुक्त कार्यालयाला कळवत त्याच्या निलंबनाचा अध्यादेश काढण्यात यावा, असे आदेश दिले होते. त्यानुसार पुणे विभागीय आयुक्त कार्यालयाने सातारा पालिकेला अध्यादेश पाठवला.