सातारा (कराड) - राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा कराड दक्षिणचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांचे मूळ गाव असलेले पाटण तालुक्यातील कुंभारगाव हे सध्या कोरोनाचा हॉटस्पॉट बनले आहे. एप्रिल महिन्यापासून कुंभारगावात कोरोनाबाधित रूग्ण आढळत आहेत. त्यामुळे शनिवारपासून (दि. 10) ग्रामस्थांनी जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय घेतला आहे. पाटण तालुक्यातील ढेबेवाडी खोर्यातील तळमावले बाजारपेठेपासून अवघ्या काही कि. मी. अंतरावर असलेले कुंभारगाव सध्या कोरोनाचा हॉटस्पॉट बनले आहे. एप्रिल महिन्यापासून कुंभारगावात कोरोनाचे रूग्ण आढळत आहेत.
बाधित रूग्णांच्या संपर्कातील लोक खुलेआम फिरतायेत
तळमावले प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणार्या गावांमध्ये 96 रूग्ण आढळले आहेत. त्यातील 8 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या 16 रूग्ण अॅक्टिव्ह आहेत. बाधित रूग्ण आढळत असताना, वैद्यकीय यंत्रणा मात्र ढिम्म आहे. बाधित रूग्णांसह त्यांच्या संपर्कातील लोक खुलेआम फिरत आहेत. ढेबेवाडी, तळमावले या बाजारपेठांत लोकांची गर्दी आहे. दरम्यान, बाजारपेठेत नियमांचा बोजवारा उडाल्याचे चित्र पहायला मिळत आहे. तळमावले या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या क्षेत्रात कुंभारगावचा समावेश होतो. या गावात कोरोनाबाधितांची संख्या मोठी आहे. दिवसेंदिवस बाधितांची संख्याही वाढत आहे. वैद्यकीय यंत्रणेकडून ट्रेसिंग आणि टेस्टिंगमध्ये हलगर्जीपणा होत असल्याने, बाधितांची संख्या वाढताना पहायला मिळत आहे. लसीकरणाचे प्रमाणही कमी आहे. या सर्व पार्श्वभूमीवर कुंभारगाव ग्रामपंचायतीने शनिवारपासून (दि. 10) आठ दिवस जनता कर्फ्यू लागू केला आहे. मेडिकल, दवाखाने आणि दूध डेअरी वगळता सर्व आस्थापना बंद ठेवण्यात येणार आहेत. तसेच, नियमांचे उल्लंघन करणार्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा ग्रामपंचायतीने दिला आहे.
पुर्वी कुंभारगाव होते नारूग्रस्त गाव
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे कुंभारगाव हे मूळ गाव असले, तरी अनेक वर्षांपासून चव्हाण कुटुंबीयांचे वास्तव्य कराडमधील पाटण कॉलनीत आहे. माजी केंद्रीय मंत्री दिवंगत आनंदराव चव्हाण, माजी खासदार दिवंगत प्रेमलाताई चव्हाण यांच्यापासून चव्हाण कुटुंबीय कराडमध्ये राहत आहे. पृथ्वीराज चव्हाणही कराडच्या पाटण कॉलनीतच राहतात. 30 वर्षांपुर्वी विकासाच्या कोणत्याही सुविधा नसताना कुंभारगाव हे नारू रोगाने त्रस्त होते. त्यावेळी पाण्याचे मोठे दुर्भिक्ष्य होते. त्यामुळे नागरीकांना नारळाच्या बेल्ट्याने झर्यात उतरून पाणी भरावे लागत होते. दुषित पाण्यामुळे कराड दक्षिणसह ढेबेवाडी खोर्यातील कुंभारगाव परिसरात नारू रोगाचा मोठा फैलाव झाला होता. सध्या या गावाला कोरोनाचा विळखा पडला आहे.