सातारा - सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामधील वलवण नियतक्षेत्रात फासा लावून शिकार्यांंनी साळींदराची शिकार केली. या प्रकरणी वनाधिका-यांनी महादेव कोंडीराम जाधव व पांडुरंग महादेव जाधव (रा. उगवतीवाडी वलवण) यांना अटक केली.
महाबळेश्वरचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या समोर आरोपींना हजर केले असता त्यांंना पाच दिवसांची वनकोठडी देण्यात आली. वन्यजीव विभागाच्या बामणोली परिक्षेत्रातील वलवण नियतक्षेत्रात फासा लावून साळींदराची शिकार झाल्याची बातमी वनाधिका-यांना मिळाली. अटकेत असलेल्या दोन्ही संशयितांची चौकशी केली असता त्यांनी गुन्हा कबुल केला. त्यांच्याविरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 चे कलम 9, 27, 29 अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
शिकारीबाबत कोणतीही माहिती असल्यास वनविभागास कळवावे. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाईल व बक्षीस ही दिले जाईल, असे आवाहन बामणोलीचे वनक्षेत्रपाल बी.डी. हसबनिस यांनी केले आहे.
ही कारवाई सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक एम.एन. मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली हसबनीस, वलवणचे वनपाल एस.एस. कुंभार, वनरक्षक एस. एस. शेंडगे, ए. बी. सावंत, सुमित चौगुले, आर. व्ही. भोपळे, आर. एस. आवारे यांनी ही कारवाई केली.