सातारा - शिकारीच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत पिरेवाडी येथील युवकाकडून 25 हजार रुपयांची खंडणी उकळण्यात आली होती. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी वनपाल योगेश गावीत अखेर बोरगाव पोलिसांना शरण गेला आहे. यापूर्वी वनरक्षक महेश सोनवले याला अटक करण्यात आले असून त्याची पोलीस कोठडीची मुदत संपल्याने न्यायालयाने पुन्हा दोन दिवसांची वाढ केली आहे. वनपाल योगेश गावीत याला मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या गुन्ह्यातील दोन वनरक्षक अद्याप फरार आहेत.
महेश सोनवले याला पोलिसांनी बुधवारी अटक केली होती. सध्या तो पोलीस कोठडीत आहे. सायंकाळी गावितला ताब्यात घेण्यात आले. खंडणीप्रकरणातील अन्य दोन वनरक्षक रणजित काकडे व किशोर ढाणे अद्याप फरार आहेत. त्यांनाही लवकरच अटक करण्यात येईल, असे तपास अधिकारी, बोरगावचे सहाय्यक निरीक्षक डाॅ. सागर वाघ यांनी सांगितले.