सातारा - शिकारीच्या उद्देशाने जाळे (वाघर) लावून बसलेल्या दोघांना निगडी (ता.सातारा) येथील वनक्षेत्रात वनाधिकाऱ्यांनी अटक केली. न्यायालयाने दोन्ही संशयितांची एक दिवसाच्या वनकोठडीत रवानगी केली आहे.
सातारा तालुक्यातील निगडी वनक्षेत्रात शिकाऱ्यांनी शिकारीसाठी जाळे लावले असल्याची माहिती वनविभागाला मिळाली होती. वन कर्मचाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन सापळा लावला. त्यामध्ये सुनील साळुंखे व युवराज उर्फ विकास संपत पवार (दोघेही रा. निगडी) अलगद वनविभागाच्या जाळ्यात अडकले. त्यांच्याकडून 2 वाघरी व कुऱ्हाड असे शिकारीसाठी वापरण्यात येणारे साहित्य हस्तगत करण्यात आले. या पूर्वीही दोनवेळा याच पद्धतीने सशाची शिकार केल्याची कबूली संशयितांनी वनाधिकाऱ्यांकडे दिली. ही कारवाई वनक्षेत्रपाल शीतल राठोड यांनी वनरक्षक प्रशांतकुमार पडवळ, राजकुमार मोसलगी, मारुती माने, संजय धोंडवड, सुहास भोसले, रणजित काकडे व वसंत पवार यांनी केली.
स्वसंरक्षणार्थ साहित्य द्यावे -
वन्यप्राणी शिकार प्रकरणात आरोपींना पकडत असताना वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना अक्षरशः जिवावर उदार होऊन कामगिरी पारपाडावी लागते. त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारची साधनसामग्री अथवा स्वसंरक्षणासाठी काहीच हत्यार नसते. वरीष्ठ वनाधिकाऱ्यांनी याबाबतीत लक्ष घालून वनकर्मचाऱ्यांना स्वसंरक्षणासाठी साहित्याचा पुरवठा करावा, अशी मागणी वनरक्षक वनपाल संघटना सातारचे कार्याध्यक्ष प्रशांतकुमार पडवळ यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केली.