सातारा - सिलिंडरच्या रेग्युलेटरमधील गॅस गळतीमुळे भडका होऊन आग लागल्याची घटना मलकापूर उपनगरातील कोयना वसाहतीत उघडकीस आली आहे. या घटनेत 50 हजार रूपयांचे नुकसान झाले आहे.
वर्कशॉपमध्ये नोकरी करणारे दीपक श्रीपती जाधव हे पत्नी व दोन मुलींसोबत मलकापूरच्या कोयना वसाहतीमधील शिवदर्शन कॉलनीत राहतात. शनिवारी त्यांच्या घरातील गॅस संपल्याने त्यांनी पालकर गॅस एजन्सीजमधून गॅस सिलिंडर आणून जोडला होता. परंतु, रेग्युलेटरमधून गॅस गळती होत असल्याने त्यांनी याबद्दल गॅस एजन्सीकडे तक्रार नोंदविली. एजन्सीतील कर्मचार्याने घरी येऊन सिलिंडर आणि रेग्युलेटर पुन्हा जोडून दिले. रविवारी सकाळच्या सुमारास त्यांच्या पत्नीने स्वयंपाकासाठी गॅस सुरू केला. त्यानंतर दहा मिनिटात अचानक भडका होऊन घरात आग लागली.
दरम्यान, रेग्युलेटरच्या सभोवती गॅस गळती होत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आल्यामुळे जाधव कुटुंबीयांसह घराबाहेर धाव घेतली. त्यांनी आरडाओरडा केल्यामुळे शेजाऱ्यांनी तातडीने अग्निरोधक यंत्राच्या साहाय्याने आग विझवली. परंतु, तोपर्यंत आगीमध्ये घरातील साहित्य जळाले होते. ओनिडा कंपनीचा एलईडी टीव्ही, धान्य, कपडे, अंथरून तसेच रोख 10 हजार रुपये जळून खाक झाले होते. या घटनेत अंदाजे 50 हजार रूपयांचे नुकसान झाले. या घटनेची माहिती मिळताच कराड शहर पोलीसांनी घटनास्थळी जाऊन घटनेचा पंचनामा केला. या पुढील तपास पोलीस नाईक मिलिंद बैले हे करत आहेत.
हेही वाचा - अंतापर्यंत दुसरे शिवाजी महाराज होणे नाही, ह्यांचं डोकं फिरलयं'