सातारा - विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या बंगल्यात घुसून एका युवकाने अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याची घटना घडली. तसेच त्या युवकाने बंगल्यातील कुंड्यांचीही तोडफोड केली आहे. याप्रकरणी संशयित युवकावर फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रात्री १० सुमारास रामराजे नाईक निंबाळकर राहत असलेल्या फलटण येथील विद्यानगर परिसरातील 'लक्ष्मी विलास' बंगल्यात विजय पांडुरंग मदने (वय, 39 रा. भूषणगड, ता. खटाव) यांनी नाईक निंबाळकर यांच्या नावाने अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत गोंधळ घातला. तसेच बंगल्याच्या आवारात असणाऱ्या चार ते पाच कुंड्यांचीही तोडफोड केली. घटना घडली तेव्हा बंगल्याच्या आवारात कोणीच नव्हते. त्यामुळे याप्रकरणी सौरभ विनोद कणसे रा. विद्यानगर फलटण यांनी फिर्याद दिली आहे. संबंधित संशयित आरोपी विजय मदने याला पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान विजय मदने यांनी हे कृत्य का केले. याबाबत फलटण पोलीस तपास करत आहेत.