सातारा - कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्यात वाई येथे पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रसिद्ध बावधन बगाड यात्रा संयोजन समितीने कोरोना विषाणूबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे पालन केले नाही. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी गर्दीच्या ठिकाणी होणाऱ्या सार्वजनिक कार्यक्रमांवर मर्यादा घातल्या होत्या. त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत सातारा जिल्ह्यात वाई तालुक्यातील बावधन येथील संयोजन समितीने यात्रा भरवली. तसेच बगाडाची शोभायात्राही काढली. छबिन्याचेही आयोजन करण्यात आले होते. आज पाचवड (ता. वाई) मंडल अधिकारी सचिन शिवाजी जाधव (वय 40) यांनी वाई पोलिसात तक्रार दिली. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले होते. त्यानुसार सूचनांचे उल्लंघन करणे, पोलिसांची पूर्व परवानगी न घेणे, मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी जमा करणे, कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्याच्या अनुषंगाने प्रशासनाकडून केल्या जात असलेल्या उपाययोजनांमध्ये अडथळा निर्माण करणे, असे आरोप बगाड यात्रा संयोजन समितीच्या पदाधिकाऱ्यांवर लावण्यात आले आहेत.
बगाड यात्रा संयोजन समितीचे अध्यक्ष राजेंद्र आबाजी भोसले, उपाध्यक्ष दीपक दिलीप ननावरे, सचिव अंकुश जगन्नाथ कुंभार, खजिनदार सचिन आप्पासो भोसले, सदस्य संभाजी शिवाजी दाभाडे (सर्व रा. बावधन तालुका वाई जिल्हा सातारा) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.