सातारा - कराड पालिकेच्यावतीने सूर्यवंशी मळा येथे ड्रेनेजसाठी काढण्यात आलेल्या खड्ड्यात पडल्याने मंगळवारी मोटरसायकलस्वाराचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी पोलीस ठाण्यात देण्यात आलेल्या फिर्यादीवरून कराड शहर पोलिसांनी संबंधित कामाच्या ठेकेदाराविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.
कराड शहरातील वाढीव भागात विकासाची कामे सुरू आहेत. या अंतर्गत सूर्यवंशी मळा मार्गावर ड्रेनेज लाईन टाकण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी खोदकाम करण्यात आले असून ठेकेदाराने त्या ठिकाणी दिशादर्शक फलक लावले नव्हते. त्यामुळे विजय पांडुरंग शिंदे (रा. मंगळवार पेठ, कराड) या मोटरसायकलस्वाराचा खड्ड्यात पडून मृत्यू झाला. या घटनेमुळे ड्रेनेज कामाच्या ठेकेदाराने केलेल्या हलगर्जीपणाबद्दल कराडमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. कराड नगरपालिका मुख्याधिकार्यांच्या फोटोला पुष्पहार घालून प्रतिकात्मक श्रध्दांजली वाहण्यात आली होती. खड्ड्यात पडून शिंदे यांचा मृत्यू झाल्यानंतर कराड शहर पोलीस ठाण्यात अपघाताची फिर्याद देण्यात आली. त्यात कामाच्या ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळेच अपघात झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. यावरून ठेकेदाराविरूध्द गुन्हा नोंद करण्यात आला असून अन्य ठेकेदार हबकले आहेत.