सातारा - मुंबई शहर पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेल्या विवाहित महिला कॉन्स्टेबलने सासरच्या घरात आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना फलटणमधील नागेश्वरनगर-चौधरवाडी येथे घडली आहे. ऋतुजा सुशांत रासकर (वय २२), असे आत्महत्या केलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी ऋतुजा यांचे सासरे बाळू रासकर यांनी फिर्याद दिली आहे. या धक्कादायक घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. ही आत्महत्या का करण्यात आली याचे कारण अद्याप तरी स्पष्ट झालेले नाही.
पोलीस मुख्यालयात होत्या कार्यरत - ऋतुजा रासकर या मुंबई शहर पोलीस मुख्यालयात नेमणुकीस होत्या. त्या फलटणला आपल्या घरी आल्या होत्या. दुपारच्या सुमारास घरातील लोखंडी अँगलला नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन त्यांनी आपले जीवन संपवले. ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे.
राहत्या घरात आत्महत्या - पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऋतुजा रासकर या सध्या नागेश्वरनगर, चौधरवाडी येथे त्यांच्या घरी आल्या होत्या. पाऊस पडू लागल्याने बाहेर वाळत टाकलेले कपडे ऋतुजा यांनी घरात नेले. काही वेळाने पाळीव मांजर बांधायचे असल्याने त्यांचे सासरे बाळू रासकर हे ऋतुजा रासकर यांच्या खोलीकडे गेले. त्यांनी ऋतुजा यांना हाका मारल्या, मात्र कोणताच प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी दरवाजा उघडून पाहिले असता सून ऋतुजाने आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले.
आत्महत्येचे कारण अस्पष्ट - महिला पोलीस असलेल्या ऋतुजा रासकर यांनी कोणत्या कारणातून आत्महत्या केली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेमुळे नागेश्वरनगर-चौधरवाडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेची आकस्मित मृत्यू म्हणून फलटण शहर पोलीस ठाण्यात नोंद झाली असून पोलीस अधिक करीत आहेत.
हेही वाचा -