कराड (सातारा) - सुनेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने सासऱ्याचा ह्रदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे. ही घटना वसंतगड (ता. कराड) येथे शुक्रवारी (दि. 17 जुलै) घडली.
पंधरा दिवसापूर्वी वसंतगडमधील दाम्पत्य मुंबईहून गावी आले होते. दरम्यानच्या काळात संबधित महिला कराडच्या शासकीय रुग्णालयात जाऊन आली होती. त्यानंतर त्यांना त्रास होऊ लागल्याने महिलेची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्या चाचणीचा अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राची गाडी दारात आली. आरोग्य कर्मचारी कोरोनाबाधित महिलेस घेऊन गेल्यानंतर काही वेळातच त्यांच्या सासऱ्याचा ह्रदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. सुनेचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याचा त्यांना जबर धक्का बसला होता. मृताची सून कोरोना पॉझिटीव्ह आल्याने तिच्या सासऱ्याचा अंत्यविधी कराड येथील कोविड स्मशानभुमीत करण्यात आला.
सातारा जिल्ह्यातील 6 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील बाधितांच्या संख्येबरोबरच मृतांचा आकडा वाढत आहे. ताज्या अहवालासह जिल्ह्यातील कोरोनाच्या बळींची संख्या 80 झाली आहे. दरम्यान, 69 जणांचे अहवाल कोरोना पाॅझिटीव्ह आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
दरम्यान, कोरोनाचा संसर्ग राज्यात दिवसेंदिवस वाढत चालला आहे. शुक्रवारी (दि. 17 जुलै) सलग तिसऱ्या दिवशी आठ हजारापेक्षा अधिक कोरोनाग्रस्तांची नोंद झाली आहे. महाराष्ट्रात शुक्रवारी दिवसभरात 8 हजार 308 नवे कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर 2 हजार 217 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 54.81 टक्के असून आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्यांची एकूण संख्या 1 लाख 60 हजार 357 इतकी झाली आहे.