सातारा : मध्यप्रदेशमध्ये 31 जानेवारीपासून सुरू होणार्या खेलो इंडिया स्पर्धेत कराड तालुक्यातील किरपे या खेडेगावातील शेतकर्याची मुलगी प्राची अंकुश देवकर ही सातार्याचे प्रतिनिधीत्व करताना दिसणार आहे. प्राचीने गुवाहाटीत झालेल्या क्रॉसकंट्री स्पर्धेत नुकतेच सुवर्णपदक पटकावले आहे. आता तिला खेलो इंडिया स्पर्धेत महाराष्ट्रासाठी सुवर्ण पदक आणायचे आहे. त्यासाठी ती दिवस-रात्र सराव करत आहे. खेलो इंडिया स्पर्धेतील निवडीबद्दल तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे.
प्राचीच्या यशाचा प्रवास कौतुकास्पद : गुणवत्तेला कसलाही आधार लागत नाही. किंबहुना गुणवत्ता ही कधीच गरीब-श्रीमंत असा भेदभाव करत नाही. हिरा जसा चमकायचा राहत नाही, तशीच गुणवत्ता ही कधी ना कधी समोर येते. त्याचाच प्रत्यय प्राची देवकर हीच्या निवडीने आला आहे. शेतकर्याची मुलगी असलेल्या प्राचीचा आजवरचा प्रवास थक्क करणारा आहे. आई-वडीलांचे पाठबळ, प्रशिक्षकांचे मार्गदर्शन आणि मेहनतीच्या जोरावर तिने आतापर्यंत 70 हून अधिक ट्रॉफी तसेच मेडल्स मिळवली आहेत. खेलो इंडिया स्पर्धेतील निवडीमुळे तिच्या घरी शुभेच्छा देणाऱ्यांची रिघ लागली आहे. लेकीच्या या कौतुकाने तिच्या आई-वडीलांचा ऊर अभिमानाने भरून येत आहे.
गुवाहाटीतील स्पर्धेत सुवर्ण पदक : आसाममधील गुवाहाटीत दि. 8 जानेवारी रोजी झालेल्या क्रॉसकंट्री स्पर्धेत प्राचीने 4 किलोमीटर धावण्याच्या स्पर्धेत सुवर्णपदाकाला गवसणी घातली. विशेष म्हणजे स्पर्धेसाठी ती विमानाने एकटीच गुवाहाटीला गेली होती. तिचे वडील शेतकरी आणि आई घरकाम करते. अशा परिस्थितीतही आई-वडीलांनी तिच्या स्पर्धेसाठी पैसे गोळा केले. तिच्या समवेत विमानाने जाणे आई-वडीलांना परवडणारे नव्हते. त्यामुळे प्राची एकटीच स्पर्धेला गेली होती. प्राचीने सुवर्ण पदक पटकावल्याचे कळताच आई-वडीलांच्या आंनदाला पारावार उरला नाही. लेकीचा सत्कार आणि कौतुक सोहळा पाहून मुलीने कष्टाचे चीज केल्याची भावना आई-वडीलांनी व्यक्त केली.
शिक्षकांनी योग्यवेळी गुण हेरले : प्राची हिचे प्राथमिक शिक्षण किरपे गावात झाले. ती चौथीत असताना शालेय स्पर्धेत तिच्यातील क्रीडा गुण अंकुश नांगरे या शिक्षकाने हेरले. तिच्या घरी जाऊन नांगरे गुरूजींनी आई-वडीलांना तिच्या क्रीडा नैपुण्यावर लक्ष देण्यास सांगितले. तेव्हापासून ती शालेय स्पर्धेत चमकत गेली. तांबवे गावातील स्वातंत्र्यसैनिक आण्णा बाळा पाटील विद्यालयात तिच्यातील क्रीडा गुणांना मोठा वाव मिळाला. सध्या प्राची कराड येथील सौ. वेणूताई चव्हाण महाविद्यालयात बी. ए. च्या प्रथम वर्गात शिकत आहे. पहाटे 5 वाजता ती गावातून कराडच्या छत्रपती शिवाजी स्टेडियमवर सरावाला जाते. राष्ट्रीय खेळाडू अतुल पाटील हे तिचा सराव घेतात. प्राची महाराष्ट्रासाठी नक्कीच सुवर्ण पदक आणेल, असा विश्वास प्रशिक्षक अतुल पाटील यांनी व्यक्त केला आहे.
सुदेशनानंतर प्राचीकडून अपेक्षा : सातार्यातील खरशी (ता. जावली) गावची कन्या सुदेशना शिवणकर हीने जून 2022 मध्ये हरियाणा-पंचकुला येथे झालेल्या खेलो इंडिया स्पर्धेत सुवर्ण पदकांची हॅट्ट्रीक केली होती. तिच्या यशामुळे खेलो इंडियामध्ये सातार्याचा डंका वाजला. तिने 100 मीटरमध्ये 11.79 सेकंदाची उत्कृष्ट वेळ नोंदवल्याने कोलंबियात होणार्या जागतिक ज्युनिअर अॅथलेटिक्स स्पर्धेसाठी ती पात्र ठरली. तिच्यानंतर आता कराडची धावपटू प्राची देवकर हिच्याकडून सातारकरांना सुवर्ण पदकाच्या अपेक्षा आहेत. ती नक्कीच सुवर्णपदकाला गवसणी घालेल, असा विश्वास सातारच्या क्रीडाप्रेमींना आहे.
हेही वाचा : Rishabh Pant Post After Accident : कार अपघातानंतर ऋषभ पंतची पहिली सोशल मीडिया पोस्ट, म्हणाला..