सातारा - संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील पहिले उभे रिंगण फलटण तालुक्यातील तरडगावच्या चांदोबाचा लिंबमध्ये पार ( First Standing Arena Ceremony ) पडले. वैष्णवांच्या दाटीत अश्वांच्या नेत्रदीपक दौडीने वारकर्यांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. टाळ, मृदंग आणि माऊलींच्या गजराने आसमंत दुमदुमून गेला.
पहिल्या उभ्या रिंगणाने डोळ्याचे पारणे फेडले - संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील पहिले उभे रिंगण फलटणमधील तरडगावच्या चांदोबा लिंबमध्ये झाले. भाविकांची शिस्तबध्द उभी रांग.. माउलींच्या अश्वांची दौड... दिंडीतील वारकर्यांनी धरलेला ठेका.. टाळ-मृदंगाचा गजर, वैष्णवांच्या दाटीत रंगलेल्या फुगड्या आणि हरिनामाच्या गजराने आसमंत दुमदुमून गेला. भगव्या पताका उंचावत तल्लीन होऊन नाचणार्या वारकर्यांच्या उत्साहात चांदोबाचा लिंबमधील पहिल्या उभ्या रिंगणाने डोळ्याचे पारणे फेडले.
अश्वांच्या टापांची माती ललाटी लावून वारकरी झाले धन्य - माऊलींचा पारंपरिक मानाचा नगारखाना दाखल होताच. वैष्णवांच्या उत्साहाने सारा आसमंत भक्तिरसात चिंब होऊन गेला. रिंगण लावून झाल्यानंतर चोपदारांनी हात उंचावून इशारा करताच वैष्णवांच्या मेळ्यातून माउलींचा गजर झाला. रिंगणातून अश्व एका पाठोपाठ धावत सुटले. रथापुढील आणि मागील दिंडयांपर्यत धावत जाऊन अश्वांनी पुन्हा माघारी दौड घेतली. लक्ष-लक्ष डोळ्यांचे पारणे फेडणार्या अश्वांच्या दौडीने आषाढी वारीतील पहिल्या उभ्या रिंगणाचा सोहळा पार पडला. अश्वांच्या टापाची माती ललाटी लाऊन धन्य झाल्याची भावना यावेळी वारकर्यांनी व्यक्त केली. महिला भाविकांसह वारकर्यांनी फुगड्यांचा फेर धरत आणि पारंपरिक खेळ करत उभ्या रिंगण सोहळ्याचा मनसोक्त आनंद लुटला.
फलटण हद्दीवर सोहळ्याचे जल्लोषात स्वागत - लोणंदमध्ये माध्यान्ह आरती झाल्यानंतर पुढील प्रवासाचा भोंगा वाजला. माउलीच्या जयजयकारात मानकर्यांनी पालखी सजवलेल्या रथात ठेवली आणि लोणंदहून सोहळा तरडगावकडे मार्गस्थ झाला. फलटणच्या हद्दीवर आमदार दीपक चव्हाण, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, प्रांताधिकारी शिवाजीराव जगताप, डीवायएसपी तानाजी बरडे, तहसीलदार समीर यादव, मुख्याधिकारी संजय गायकवाड, गटविकास अधिकारी डॉ. अमिता गावडे, पोलीस निरीक्षक भारत किंद्रे, धन्यकुमार गोडसे यांनी पालखी सोहळ्याचे स्वागत केले. चांदोबाचा लिंब येथील उभे रिंगण झाल्यानंतर सोहळा तरडगाव मुक्कामी पोहोचला.
आषाढी एकादशी 10 जुलै रोजी - मागील दोन वर्षापासून विठ्ठलाच्या भेटीसाठी वारकरी हा अतुरलेला होता. भेटी लागी जीवा म्हणत विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी मागील दोन वर्षापासून वारकऱ्यांना पायी दिंडीत जाता आले नाही. मात्र कोरोना महामारीचे संकट काहीसे निवळले असल्यामुळे त्यामुळे मोठ्या संख्येने वारकरी हे विठ्ठलाच्या दर्शनासाठी पायी दिंडीत दाखल झाले आहेत. हे वारकरी आषाढी एकादशी दिवशी दर्शन घेण्यासाठी पंढरपुरात पोहोचतील. 10 जुलै रोजी आषाढी एकादशी आहे.
हेही वाचा - Thackeray On Mumbai : माझ्यावरचा राग मुंबईवर काढू नका, उद्धव ठाकरेंचे नव्या सरकारला आवाहन
हेही वाचा - Landslide In Mumbai : मुंबईत पेडर रोडला दरड कोसळली, दोन इमारतीचे भागही कोसळले