सातारा - जिल्ह्यात गेल्या दीड महिन्यात १५० पेक्षा जास्त ठिकाणी वणवे लागून मौल्यवान वनसंपत्ती नष्ट झाली आहे. दररोज कुठे ना कुठे वणवा लागत आहे. वणवा विझवण्यासाठी वन विभाग प्रयत्न करते. मात्र, हा वणवा लागूच नये यावर जोर दिला तर वनसंपदा वाचवता येऊ शकेल, असा आशावाद पर्यावरणप्रेमींनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना व्यक्त केला.
डोंगरउतार, अडचणीचे ठिकाण, वणवा पसरण्यास अनुकूल परिस्थिती, पाण्याची वानवा अशा विचित्र परिस्थितीशी सामना करत वन कर्मचारी या वणव्यांशी झुंज देतात. दररोज वेळी-अवेळी हा विस्तवाशी खेळतात. लागवड, संवर्धन, संगोपन, कोर्ट केसेस, गुन्ह्यांचा तपास इतर प्रशासकीय कामकाजाची कामे टाकून त्यांना वणवे विझवण्यासाठी पळावे लागते. मात्र, वन विभागाकडे कामे जास्त आणि मनुष्यबळ कमी अशी परिस्थिती सातारा जिल्ह्यात तयार झाली आहे.
वणव्याची जबाबदारी गावाकडे
वणवा विझवण्याबरोबरच तो लागूच नये यासाठी अधिक जोरकसपणे प्रयत्न व्हायला हवेत. "गावात कोण वणवा लावतो याची माहिती स्थानिक पातळीवर पोलीस पाटील किंवा तत्सम यंत्रणेला असते. ग्रामस्वच्छता अभियानासारख्या लोकसहभागाच्या स्पर्धांमध्ये स्वच्छता, वैयक्तीक शौचालय, कुऱ्हाड बंदी बरोबरच गावच्या हद्दीत वणवा लागू न देण्याच्या निकषाचा समावेश करावा. जेणेकरून स्थानिक पातळीवरच वणवा लावणाऱ्यांना प्रतिबंध बसेल. तसेच एखाद्याने आगाऊपणा केल्यास त्यांना शोधून केसेस दाखल करणे सोयीचे होईल", असे मत साताऱ्याचे वन्यजीव रक्षक सुनील भोईटे यांनी व्यक्त केले.
मानव-वन्यजीव संघर्षाचा धोका
वणवा कोण लावतो याचा गावपातळीवर स्थानिकांना अंदाज असतो. वनविभागाने अशा लोकांना बोलावून त्यांचे मनपरिवर्तन करण्याचा प्रयत्न केल्यास मोठ्या प्रमाणात अशा प्रकारांना आळा बसू शकेल, असे आग्रही मत 'वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन अँड रिसर्च सोसायटी' या संस्थेचे प्रमुख डॉ. अमित सय्यद यांनी व्यक्त केले. शेतकरी या दिवसात बांध पेटवून निघून जातात. हीच आग वनक्षेत्रात पसरते. त्यामुळे शेतकऱ्यांनी बांध पेटवताना तो विझेपर्यंत काळजी घेतल्यास वणव्याला आळा बसू शकेल, असे कुशल रोहिरा या पर्यावरणप्रेमीने सुचवले. वणव्याच्या धगीमुळे वन्यजीव सैरभैर होतात व चुकून मानवी वस्तीत येतात. त्यातून मानव-वन्यजीव संघर्षाचा धोका वाढतो, अशी चिंता ओंकार घोडके यांनी व्यक्त केली.
तपासाला लागतोय वेळ
अनेक वेळा वनक्षेत्रापासून एक-दीड किलोमीटरवर वणवा लावला जातो. वनक्षेत्रात तो येऊ नये म्हणून कर्मचाऱ्यांमार्फत विझवलाही जातो. मात्र, वणवा लावल्याचे ठिकाण अज्ञात राहिल्याने तपासाला थोडा अधिक वेळ लागत असल्याचे साताऱ्याच्या वनक्षेत्रपाल शीतल राठोड यांनी सांगितले.
हेही वाचा - विद्यार्थ्यांना भाज्यांची माहिती देणारी सेंद्रीय परसबाग