सातारा - क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात दाखल असणारे 8 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने आज त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. उपचार घेणाऱ्या बाधितांचा आकडा कोरोनामुक्तांच्या संख्येने ओलांडला आहे. आजअखेर जिल्ह्यात 106 कोरोनामुक्त झाले असून 71 बाधित रुग्णालयात उपचार घेत आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
आज साताऱ्याच्या क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयातून बरे झालेल्या 8 रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामध्ये तरडगाव (ता. फलटण) येथील 67 वर्षीय महिला व 6 वर्षांचा मुलगा, फलटण येथील 33 वर्षीय महिला, खंडाळा तालुक्यातील लोणंद येथील 13 वर्षांची मुलगी, कोडोली (ता. सातारा) येथील 18 वर्षांचा युवक, मुळचा महाबळेश्वर येथील 23 वर्षीय युवक, त्रिपूटी (ता. कोरेगाव) येथील 36 वर्षीय तरुण व खटाव तालुक्यातील खरसिंगे या गावचा 18 वर्षीय युवक असे एकूण 8 जण करोनामुक्त झाले. त्यांना आज क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयातून पूर्णपणे बरे झाल्याने घरी सोडण्यात आले.
आतापर्यंत जिल्ह्यातील 106 नागरिक कोरानामुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आलेले आहे. जिल्ह्यातील बाधितांची संख्या 181 वर पोहोचली असली तरी 106 रुग्ण बरे झाले, हे अधिक दिलासादायक आहे. 71 बाधित उपचार घेत आहेत, तर 4 बाधितांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.